शहरातील वाहने आणि पदपथांवरील पादचारी यांना शहरातून व्यवस्थितपणे मार्गक्रमण करता यावे यासाठी प्रत्येक शहराला सिग्नल यंत्रणेची गरज असते. मात्र कल्याण-डोंबिवली शहरामध्ये उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा गेल्या ११ वर्षांपासून बंद आहे. २००४ मध्ये ५४ लाख रुपये खर्च करून सुरू करण्यात शहरातील आलेली सिग्नल यंत्रणा जेमतेम एक वर्ष रडतखडत कार्यरत राहिली. त्यानंतर नादुरुस्त झालेली ही यंत्रणा कधी दुरुस्तच झाली नाही. पुढे या यंत्रणेच्या दुरुस्तीवरही लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. तरीही सिग्नल यंत्रणा कधीच वापरामध्ये येऊ शकली नाही.
सुरुवातीच्या काळात ही यंत्रणा कार्यरत असल्याने वाहतूक पोलिसांवरील भार कमी झाला होता. कल्याण शहरात दुर्गामाता चौक, सहजानंद चौक, लालचौकी, शिवाजी चौक, काबूलसिंग मार्ग, गुरुदेव जंक्शन, वल्लीपीर मार्ग, सुभाष चौक, नेहरू चौक, काटेमानिवली जंक्शन, महात्मा फुले चौक अशा एकूण अकरा ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले होते. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही यंत्रणा जेमतेम एक वर्षच चालली आणि त्यानंतर त्याच्या नादुरुस्तीचे प्रकार वाढले.
याचा निषेध म्हणून कल्याणच्या एका सामाजिक संस्थेच्या वतीने या सिग्नलची पूजा, त्यानंतर सिग्नलची शोकसभा भरवून प्रतीकात्मक पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला होता. मात्र अशा निषेध मोर्चाचा पालिकेतील सत्ताधारी आणि पालिका प्रशासनावर कोणताही फरक पडला नाही. वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांना वाहतूक सेवक, गृहरक्षक यांच्या साहाय्याने वाहतुकीचे नियोजन करावे लागते. शहर परिसरातील वाहने मोठय़ा संख्येने शहरात ये-जा करीत असतात.
शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे म्हणून शासन आदेशाप्रमाणे सात हजार कोटींचा एकात्मिक शहर वाहतूक विकास आराखडय़ाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. हे प्रस्ताव प्रत्यक्ष अमलात आले तर वाहतूक कोंडी हा प्रश्नच शहरात निर्माण होणार नाही.
कल्याण-डोंबिवलीत सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहतूक नियम म्हणजे नेमके काय पाळायचे, असा प्रश्न पडतो. गेली अनेक वष्रे सत्तेत असलेल्या पक्षांकडून सिग्नल यंत्रणा सुरू करण्याचे कोणतेच प्रयत्न झालेले नाही. – दीपक साळुंखे, कल्याण

कल्याण शहरात सिग्नल नसल्याने रस्ते ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत असून पादचाऱ्यांना अनेक वेळा अपघातांचा सामना करावा लागतो. महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी सिग्नलच्या नावे पैसे घेऊन त्याचा उपयोग आपले खिसे भरण्यासाठी केला आहे.
-सुनील पढय़ार,कल्याण