21 January 2021

News Flash

चौकातील बेशिस्तीला सिग्नलचा चाप!

‘लोकसत्ता ठाणे’च्या २१ ऑक्टोबरच्या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाकडून हे काम सुरू करण्यात आले

नितीन कंपनी चौकात सिग्नल बसवण्याचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण होणार आहे.

नितीन कंपनी चौकात अखेर सिग्नल यंत्रणा बसवणार

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचे जंक्शन अशी ओळख असलेल्या नितीन कंपनी चौकामध्ये सिग्नल उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला असून पुढील १५ ते २० दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊ शकणार आहे. महापालिका प्रशासन, विद्युत विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे काम प्रगतीपथावर असून यामुळे या भागातील अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच या भागातील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होऊ शकणार आहे.

‘लोकसत्ता ठाणे’च्या २१ ऑक्टोबरच्या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाकडून हे काम सुरू करण्यात आले असून या सिग्नलसाठी आग्रही असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. वाहतूक शिस्तीचे वावडे असणाऱ्या या चौकात गेल्या सहा वर्षांत ३८ दुर्घटना झाल्या आहेत. त्यामुळे हा चौक अपघातप्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखला जातो. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वाहतूक बेशिस्तीस लगाम बसेल, असा दावा शहर वाहतूक अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. ठाण्यातील पूर्व-द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखालील रस्त्यावर असलेल्या नितीन कंपनी चौकामध्ये एकाच ठिकाणी शहरातील आठ रस्ते एकाच ठिकाणी एकत्र येतात. एकाचवेळी मुंबई-नाशिक-ठाणे स्थानक आणि नवे ठाणे अशा सगळ्याचा दिशांना जाणाऱ्या वाहतुकीला येथील सिग्नल नसल्यामुळे नियंत्रण करणे अवघड होते. वाहतूक कर्मचारी नसताना आणि रात्रीच्या वेळी मनमानी पद्धतीने वाहने चालवून वाहनचालकांचे आणि नागरिकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. गेली सहा वर्षांमध्ये ३८ अपघातांमध्ये १९ वाहनचालक आणि १९ नागरिकाना दुखापतींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे येथील भाग अपघातप्रवण क्षेत्र बनला होता. येथील उड्डाण पूल बांधताना येथील सिग्नल यंत्रणा हटविण्यात आली. आजतोवर ही यंत्रणा पुनस्र्थापित करण्यात आलेली नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयी वारंवार महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा सुरू केला होता. ‘लोकसत्ता ठाणे’च्या २१ ऑक्टोबरच्या अंकामध्ये याविषयी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिकेने या भागात सिग्नल उभारण्याच्या कामाला सुरुवात केली असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील १५ ते २० दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.

नितीन कंपनी चौकामध्ये आठ रस्ते एकत्र येत असल्यामुळे या भागातील वाहतूक नियंत्रणासाठी आठ ते नऊ माणसांची गरज लागत असून दोन शिफ्टमध्ये १६ कर्मचारी या भागात काम करण्यासाठी लागत होते. इतके मनुष्यबळ या परिसरात देणे वाहतूक शाखेला शक्य होत नसल्यामुळे या भागात अत्यंत कमी कर्मचाऱ्यांच्या बळावर येथील वाहतूक नियंत्रित करावी लागत होती. सिग्नल यंत्रणेमुळे अतिरिक्त ताण काहीसा कमी होऊ शकेल. सिग्नल यंत्रणा असली तरी नागरिकांकडूनही सहकार्य आवश्यक आहे, अन्यथा सिग्नल यंत्रणेचा काहीच फायदा होणार नाही. 

-दीपक बांदेकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वागळे वाहतूक शाखा

नितीन कंपनी सिग्नलसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांकडून पाठपुरावा केला जात होता. मात्र महापालिका प्रशासन त्याकडे विशेष लक्ष देत नव्हते. ‘लोकसत्ता’मध्ये या विषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणांनी कामाचा वेग वाढवून इथे सिग्नल उभारण्यास सुरुवात केली आहे. त्याचा शहरातील वाहतुकीला फायदा होऊ शकेल.

-योगेश दळवी, माहिती अधिकार कार्यकर्ते     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 2:57 am

Web Title: signal system will fit nitin company chowk
Next Stories
1 महापौर-आयुक्तांचे मनोमीलन?
2 प्रासंगिक : हिरवाईतील साहसी प्रकार
3 संमेलनात २७ गावांचा ‘प्रयोग’
Just Now!
X