27 May 2020

News Flash

वसईत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील समस्यांमध्येही भर पडू लागली असून, वसईतील वाहतुकीच्या नियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक उग्र रूप धारण करू लागला आहे.

बेशिस्त वाहनचालकांकडून सिग्नलचे उल्लंघन; वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

वसईच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील समस्यांमध्येही भर पडू लागली असून, वसईतील वाहतुकीच्या नियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक उग्र रूप धारण करू लागला आहे. सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांसह वसईकर नागरिकही त्रस्त होत आहेत. या वाहतुकीचे योग्य प्रकारे नियमन करून नागरिकांना दिलासा देणे हे मोठे आव्हान बनले आहे.

वसई रोड स्थानक ते पारनाका या मुख्य रस्त्यावर अंबाडी नाका, पार्वती क्रॉस, माणिकपूर, पापडी नाका, पारनाका या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी हमखास वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यावरील वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे ही समस्या उद्भवत असली तरी अनेक वेळा वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्यामुळे अनेकजण वाहतुकीला अडथळा ठरेल अशा प्रकारे आपली वाहने उभी करतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. विशेष म्हणजे ज्यावेळी वाहतुकीची कोंडी होते, नेमक्या त्याच वेळी वाहतुकीचे नियमन करणारा पोलीस गायब झालेला आढळतो. वसई रोड पंचवटी नाका भागातही मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाहने उभी करून ठेवली जातात. या समस्येकडे वाहतूक पोलीसही कमाईच्या दृष्टीने पाहतात, अशी अनेक नागरिकांची तक्रार आहे.

वसई रोड स्थानक ते पापडी तलावापर्यंतच्या रस्त्याचे बऱ्यापैकी रुंदीकरण झालेले असले तरी पुढे पापडीपासून थेट वसई पारनाक्यापर्यंतचा रस्ता वाहनांच्या वाढत्या संख्येच्या दृष्टीने चिंचोळा ठरू लागला आहे. शिवाय या भागात सिग्नल यंत्रणा  नाही. गर्दीच्या वेळी या ठिकाणचे पोलीसही गायब झालेले असतात. यामुळे अनेक वेळा वाहतुकीची समस्या निर्माण होऊ  लागली आहे. वसई गावातील जानकी सिनेमा ते पारनाका या भागातही काहीवेळा वाहतुकीची कोंडी होते. याठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असूनही वाहतुकीचे नियमन होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

पोलिसांसाठी डोकेदुखी

वसई-विरार परिसराची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी प्रशासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये वसईत काही ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवली असली तरी अजूनही वाहनचालकांना या सिग्नलची सवय झाली नसल्याचे दिसून येते. आजही अनेक वाहनचालक सर्रास सिग्नलचे उल्लंघन करीत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

वसई रोड स्थानक ते माणिकपूर नाका हे मोटारसायकलवरून अवघ्या दोन मिनिटांचे अंतर संध्याकाळी गर्दीच्या वेळी पार करताना अर्धा-पाऊण तास लागतो. इतकी भयानक वाहतूक कोंडी याठिकाणी होत असते.  याठिकाणी वाहतूक कोंडीत अडकल्यावर प्रचंड मानसिक त्रास होतो. – विशाल पाटील,व्यावसायिक

माणिकपूर नाका तसेच अंबाडी रोड याठिकाणी आमचे पोलीस वाहतुकीचे नियमन करत असतात. मात्र काही ठिकाणी नवरात्रीचे मंडप उभारण्यात आल्यामुळे काही वेळा वाहतूक मंदावते. शिवाय काही ठिकाणी वाहनचालकही नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवतात. त्याचाही परिणाम वाहतुकीवर होतो. – विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 1:41 am

Web Title: signal violations top drivers neglect department of transportation akp 94
Next Stories
1 वसई स्थानकात पोलीस कोठडीची वानवा
2 ‘फटका गँग’वर पोलिसांची करडी नजर
3 कोंडीत टांग्यांची भर
Just Now!
X