मुंबई आणि ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकात मेट्रोच्या कामांमुळे गेल्या काही दिवसांपासून कोंडी होत असून त्याचा फटका या भागातून वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी गुरुवार दुपारपासून या चौकातील सिग्नल कालावधीत मोठे बदल केले आहेत. त्यानुसार मॉडेला ते तीन हात नाका वाहिनीवरील सिग्नल कालावधी २५ सेकंदांवरून ४० सेकंद केला आहे. याशिवाय, ठाणे-मुंबई वाहिनीवरील सिग्नल कालावधी ३० सेकंद, तर मुंबई-ठाणे वाहिनीवरील सिग्नल कालावधी २५ सेकंद करण्यात आला.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर तीन हात नाका चौक आहे. या चौकातून ठाणे शहराच्या अंतर्गत भागासह मुंबई परिसरात जाणारे रस्ते जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मॉडेला चेकनाका येथून तीन हात नाक्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामांच्या पार्श्वभूमीवर ‘एमएमआरडीए’ने मार्गरोधक उभारले आहेत. त्यामुळे या भागातील रस्ते अरुंद झाले असून त्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे. याच मार्गावर बेस्टच्या बसगाडय़ांचे थांबे आहेत. या बसमध्ये प्रवासी बसल्यानंतर त्या तीन हात नाका चौकातून वळसा घेऊन मॉडेला चेक नाका मार्गे मुंबईच्या दिशेने जातात. मात्र तीन हात नाका चौकात २५ सेंकदांचा सिग्नल असल्यामुळे तेवढय़ा वेळेत बसगाडय़ांना तीन हात नाकावरून वळसा घालून जाणे शक्य होत नाही. तसेच हा संपूर्ण सिग्नल दोनशे सेंकदांचा आहे. त्यामुळे सिग्नल पुन्हा हिरवा होईपर्यंत बसगाडय़ा तिथेच थांबून राहतात. काही वेळेस मार्गावरील कोंडीमुळे सिग्नलपर्यंत येईपर्यंत आणि तो पार करेपर्यंत १५ ते २० मिनिटांचा अवधी लागतो. यामुळे बसचालक आणि प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टच्या मुलुंड आगारातील उप आगार व्यवस्थापक सुनील भिसे यांनी ठाणे वाहतूक पोलिसांना पत्र पाठवून सिग्नल कालावधी १० ते १५ सेकंदांनी वाढवण्याची मागणी केली. त्यानुसार ठाणे वाहतूक पोलिसांनी तीन हात नाका सिग्नलच्या कालावधीत मोठे बदल केले आहेत.

सिग्नल कालवधीतील बदल असे..

* तीन हात नाका चौकातील मॉडेला ते तीन हात नाका वाहिनीवरील सिग्नल कालवधी २५ सेकंद होता, तो आता ४० सेकंद केला आहे.

* ठाणे-मुंबई वाहिनीवरील सिग्नल कालावधी पाच सेकंदाने वाढवून तो ३० सेकंद, तर मुंबई- ठाणे वाहिनीवरील सिग्नल कालावधी पाच सेकंदाने कमी करून तो २५ सेकंद करण्यात आला आहे.

* या चौकातील सिग्नल टाळण्यासाठी मुंबईहून ठाणे किंवा घोडबंदरला जाणारी बहुतांश वाहने उड्डाणपुलाचा वापर करतात. त्यामुळे सिग्नलचा वेळ कमी झाल्यास त्याचा फारसा परिणाम वाहतुकीवर होणार नाही, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.