ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई; तक्रारींकरता ठाणे पालिकेची स्वतंत्र यंत्रणा

ठाणे महापालिका क्षेत्रातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून या सर्वच स्थळांच्या सभोवतालच्या शंभर मीटर परिसराचा शांतता क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात वाद्ये वाजविण्यास किंवा ध्वनिप्रदूषण करण्यास बंदी असणार आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी महापालिकेने तक्रार निवारण यंत्रणा

कार्यान्वित केली असून त्यासाठी हेल्पलाइन आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकासह ई-मेल आयडी जाहीर केला आहे. या तक्रारी पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे पाठविल्या जाणार आहेत.

ठाणे शहरातील रस्ते तसेच पदपथ अडवून उत्सव साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली असून या उत्सवाच्या निमित्ताने ध्वनिक्षेपक लावून प्रदूषण करण्यात येते. शहरातील रुग्णालये तसेच शाळांच्या परिसरातही ध्वनिक्षेपक लावून प्रदूषण केले जाते. याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या धोरणानुसार शहरात सर्वेक्षण करून २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केली होती. या सर्वच ठिकाणी ध्वनी पातळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी महापालिकेने तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तिथे तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२१०८, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ७५०६९४६१५५,  दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३९२३२३ तसेच rdmc@thanecity.gov.in हा ईमेल आयडी जाहीर केला आहे. या माध्यमामार्फत प्राप्त होणाऱ्या तक्रारी महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात स्वीकारून संबंधित सक्षम प्राधिकारी याच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

‘शांतता क्षेत्र’ कुठे?

विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय, शिवाजी पथ येथील एम.एच. मराठी हायस्कूल, जांभळी नाका येथील सेंट जॉन बाप्टिस्ट हायस्कूल, कोर्ट नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय, वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालय, ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय, बेथनी रुग्णालय, ज्युपिटर रुग्णालय, वर्तकनगर येथील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, वसंत विहार इंग्लिश हायस्कूल, सिंघानिया स्कूल, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यालय तसेच भारतरत्न इंदिरा गांधी विद्यालय, ओवळा येथील वेदांत हॉस्पिटल, माजिवडा हायस्कूल, कावेसर येथील न्यू हॉरिझोन स्कॉलर्स स्कूल, पातलीपाडा येथील सेंट झेवियर्स इंग्लिश विद्यालय, हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल, खारेगाव येथील सफायर हॉस्पिटल, कळवा येथील ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जनविकास संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, मुंब्रा येथील अल-नदी-उल-फलाह इंग्लिश स्कूल, नागसेननगर येथील अब्दुल्ला पटेल हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, शिमला पार्क येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्र ३१ आणि ४०.