भारतीय महिला फेडरेशन, ठाणे विभाग 

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कळत-नकळतपणे महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था कार्य करीत असतात. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळावेत, हा त्यामागचा हेतू असतो. भारतीय महिला फेडरेशन ही संस्था १९५४ पासून देशात या प्रकारचे कार्य करीत आहे. फेडरेशनच्या ठाणे शाखेला यंदा तीन दशके पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून गेल्या रविवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..

अंधश्रद्धा, दारिद्रय़, जातीव्यवस्था याबरोबरच स्त्री-पुरुष भेद हा भारतीय समाज व्यवस्थेतील एक प्रमुख दोष मानला जातो. आता आधुनिक काळात परिस्थिती खूप बदलली असली तरी अजूनही स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्याची पुरुषी मनोवृत्ती कायम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिलांना ‘चूल आणि मूल’ या चाकोरीतून बाहेर काढण्यासाठी संघटित प्रयत्न सुरू झाले. त्यातलीच एक संस्था म्हणजे भारतीय महिला फेडरेशन. ४ जून १९५४ रोजी संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या अरुणा असफ अली यांनी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. ठाणे शहरात १९८८ मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. पुरुषांकडून अन्याय होणाऱ्या स्त्रियांना आधार देणे, त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून कौटुंबिक कलह भेडसावणाऱ्या जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. संस्थेत राष्ट्रीय पातळीवर तारा रेड्डी, मंजु गांधी, कुसुम नाडकर्णी, लीला आवटे, मालती वैद्य ही मंडळी कार्यरत होती. त्यांच्याकडून ठाण्यातील कार्यकर्त्यां महिलांनी धडे गिरवले. त्यातूनच संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष सुनीता कुलकर्णी, सचिव गीता महाजन आदींनी ठाणे जिल्ह्य़ात कार्य सुरू केले.

ठाणे परिसरात संस्थेची एकूण पाच समुपदेशन केंद्र आहेत. चरई, वागळे इस्टेट, जिल्हा परिषद कार्यालय, भिवंडी आणि कल्याण येथे ही केंद्र काम करतात. संशय, व्यसनाधिनता, हुंडा आदी कारणांमुळे स्त्रियांवर पुरुषांकडून अन्याय, अत्याचार केला जातो. अनेकदा मारहाणही केली जाते. अशा प्रसंगी संस्थेच्या महिला कार्यकर्त्यां ही प्रकरणे हाताळतात. त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. गेल्या तीस वर्षांत संस्थेने शेकडो महिलांना न्याय मिळवून दिला आहे.

अनेकदा सासरी शारीरिक आणि मानसिक हाल झाले की ती महिला माहेरचा आसरा घेते. मात्र काही अभागी महिलांना दोन्ही ठिकाणी थारा नसतो. अशा महिलांना निवारा मिळावा म्हणून संस्थेने बदलापूर इथे एक निवारा केंद्र सुरू केले. अन्यायग्रस्त महिलेने तिथे राहून स्वत:ला सावरावे. स्वत:च्या पायावर उभे राहून मग जगात ताठ मानेने वावरावे, हा त्यामागचा हेतू. या केंद्राचाही अनेक महिला लाभ घेत असतात. शहरी भागात घरकाम करणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या हजारो महिला घरकाम करतात. घरकाम हे अत्यंत आवश्यक असले तरी त्यासाठी त्यांना देण्यात येत असलेला मोबदला अत्यल्प असतो. पुन्हा त्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाही. रजा, भविष्य निर्वाह भत्ता असे काहीच त्यांना मिळत नाही. त्यांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संस्था प्रयत्नशील आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांप्रमाणेच शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तिथे पुरुष सहकाऱ्यांकडून लैंगिक शोषणासारखे प्रकार घडतात. अशा वेळी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न या महिलांना पडतो. फेडरेशनने या संदर्भातही काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

तक्रार निवारण या कामाबरोबरच समाजात स्त्री-पुरुष समानता रुजावी म्हणून महिला फेडरेशनच्या वतीने विविध अभ्यास वर्ग, कार्यशाळा भरविल्या जातात. त्यातून सर्वसामान्य महिलांना कायद्याचे ज्ञान दिले जाते. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून कार्यकर्ते घडतात. अन्यायाविरुद्ध कशी बाजू मांडायची, याचे शिक्षण त्यांना त्यातून मिळते. त्यांची वैचारिक दृष्टी प्रगल्भ होते. संस्थेच्या वतीने महिलांसाठी नाटय़ प्रशिक्षण वर्गही भरविले जातात. त्यातून पथनाटय़, एकांकिका बसवून त्याद्वारे जनजागृती केली जाते.

अंधश्रद्धा हा सर्वच समाजासाठी शाप असला तरी त्याची अधिक झळ महिलांना बसते. त्यामुळे संस्थेच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलनाचेही उपक्रम राबविले जातात. याशिवाय सुजाण पालकत्व, शेतकऱ्यांचे प्रश्न, रेशनिंग व्यवस्थेतील अव्यवस्था आदी अनेक मुद्दय़ांवर संस्था काम करीत असल्याची माहिती ठाणे विभागाच्या अध्यक्षा सुनीता कुलकर्णी यांनी दिली.