भारत आणि चीन यांच्यातील वादाचा मुद्दा असलेला तवांग हा तसा भारताचाच भाग. पण येथील संस्कृती चीनशी जवळीक साधणारी असल्याने येथील अनेकांना भारतापेक्षा चीन जवळचा वाटतो. अशा परिस्थितीत या ठिकाणी वनसंरक्षक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ठाण्याचे प्रदीप वाहुले यांनी आपल्या चित्रकलेतून भारत आणि तवांग यांचा मिलाफ घडवण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. वाहुले यांच्या तवांग संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन सध्या तवांगमध्ये चर्चेचा विषय बनले असून याद्वारे येथील नागरिकांशी भारतीय प्रशासनाचा संवाद वाढण्याची चिन्हेही निर्माण झाली आहेत.Untitled-1
ठाण्यातील लोढा गृहसंकुलात राहणारे प्रदीप वाहुले यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली. मात्र, हे करत असतानाच स्पर्धा परीक्षेद्वारे करिअर घडवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच होता. याचे फळ त्यांना २०११मध्ये भारतीय वन सेवेसाठी झालेल्या नियुक्तीतून मिळाले. वनसंरक्षक म्हणून त्यांना पहिलीच नियुक्ती अरुणाचल प्रदेश येथे मिळाली. तवांगमध्ये नोकरीस सुरुवात केल्यानंतर त्यांनी येथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी येथील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची भावना असली तरी येथील संस्कृती चिनी संस्कृतीशी जवळीक साधणारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे भारताला या प्रदेशाबद्दलची आपुलकी दाखवण्यासाठी वाहुले यांनीही संस्कृती आणि चित्रकला यांचाच वापर करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या तीन वर्षांत तवांगमधील विविध ठिकाणे, येथील जीवन, संस्कृती यांची झलक दाखवणारी शंभराहून अधिक चित्रे वाहुले यांनी काढली आहेत. याच चित्रांचे प्रदर्शन अलीकडेच्या तवांग फेस्टिवलमध्ये भरवण्यात आले होते. अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन वाहुले यांची स्तुती केली. तर स्थानिकांशी जवळीक साधण्याच्या वाहुले यांच्या प्रयत्नांचे केंद्र सरकारनेही कौतुक केले आहे.
भारताला तवांग दाखवायचा आहे
‘तवांग शहराला पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. संस्कृती, जीवनशैली, निसर्गसौंदर्य, सणउत्सव, कलेने समृद्ध असलेले हे शहर वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र येथील नागरिक याही परिस्थितीमध्ये परंपरा आणि संस्कृतीचे जतन करतात. या संस्कृतीचे प्रतिबिंब चित्रांतून उमटवण्याचा माझा प्रयत्न रसिकांनी उचलून धरला,’ असे वाहुले म्हणाले. भविष्यात दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नईमध्ये तवांगच्या चित्रांचे प्रदर्शन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.