सामंजस्य करारानंतर प्रकल्पाला गती

ठाणे महापालिका क्षेत्राच्या विविध भागांत विजेवरील वाहनांसाठी १०० चार्जिग स्थानके उभारण्याच्या सामंजस्य करारावर महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असतानाच प्रत्यक्षात चार्जिग स्थानकांची उभारणी करण्यासाठी संबंधित कंपन्यांनी प्रशासनाच्या मदतीने जागांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे चार्जिग स्थानक उभारणी प्रकल्पाला गती मिळाल्याचे चित्र आहे.

देशभरात २०३० पर्यंत विजेवरील वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे धोरण केंद्र शासनाने आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात अशा वाहनांसाठी चार्जिग स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निधीतून १०० चार्जिग स्थानके उभारण्यात येणार होती, मात्र महिंद्रूा अ‍ॅण्ड महिंद्रा आणि कायनेटिक ग्रीन्स या कंपन्यांनी स्थानक उभारणीचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निधीतून चार्जिग स्थानके उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने गुंडाळला आहे.

महापालिका प्रशासन आता संबंधित कंपन्यांना चार्जिग स्थानके उभारण्यासाठी केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून शहरात विजेवरील वाहन उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांशी समन्वय साधण्याचे कामही महापालिका करणार आहे. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर आयुक्त जयस्वाल यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या. जानेवारीपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली होती. पालिका क्षेत्रात कोणकोणत्या भागांत किती स्थानके असतील, हे जागेच्या सर्वेक्षणानंतर स्पष्ट होणार आहे.

कोंडी टाळण्यासाठीही उपाययोजना

ठाणे शहरातील पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे पंपालगतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. भविष्यात विजेवरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर पेट्रोल आणि सीएनजी पंपाप्रमाणे तिथेही कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, याची काळजी जागेची निवड करताना घेतली जाणार आहे. चार्जिग स्थानकामध्ये किती वाहने सामावून शकतात, याचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.