20 February 2019

News Flash

 ‘ही तर २६ जुलैपेक्षाही भयावह परिस्थिती’

दरवर्षी पाऊस पडला की शहरात पाणी साचते मात्र यावर्षी प्रथमच साचलेले पाणी ओसरलेले नाही.

गेल्या तीन दिवसांपासून वसईकरांवर विविध संकटे कोसळत आहे.

वसई-विरारच्या रहिवाशांची हतबलता; घरात पाणी शिरल्याने संसार उघडय़ावर

वसई : ‘‘मी गेली अनेक वर्षे वसईत राहतो, परंतु पावसाचे इतके भयानक रौद्ररूप अनुभवले नव्हते. २६ जुलैच्या पावसापेक्षाही भयावह परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. सर्वत्र पाणी आहे, दुकाने बंद आहेत. त्यामुळे आम्हाला दूधही मिळू शकले नाही..’’ वसईत राहणारे गिरीश अय्यर सांगत होते. वसईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सर्व व्यवहार बंद झाले. त्याबाबतची हतबलता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. गेल्या तीन दिवसांपासून वसईकरांवर विविध संकटे कोसळत आहे. दरवर्षी पाऊस पडला की शहरात पाणी साचते मात्र यावर्षी प्रथमच साचलेले पाणी ओसरलेले नाही. त्यामुळे वसई परिसराला सागराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. अनेक इमारतीत पाणी शिरून तळमजल्यावरील रहिवाशांच्या घरात पाणी गेले आहे. त्याबाबत रहिवाशांनी चिंता व्यक्त केली.

गेले दोन दिवस पश्चिम रेल्वेची सेवा भाईंदर ते विरापर्यंत बंद आहे. त्यामुळे अनेक जण मुंबईला कामावर जाऊ शकले नाही, तर वसईत राहणारे काही जण मुंबईतच अडकून पडले. काही जणांनी नातेवाईकांकडे, मित्रांकडे आसरा घेतला होता. ‘‘मंगळवारी ट्रेन बंद होण्यापूर्वी वसईतून जे लोक कामावर गेले होते, ते आपापल्या कार्यालयात अडकून पडले होते. मी मंगळवारी सकाळीच निघाले मात्र त्यानंतर ट्रेन बंद झाल्या. मी घरी परतू शकले नाही. आता मी माझ्या मुंबईतील नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे,’’  असे वसईत राहणाऱ्या प्रियांका तांडेल यांनी सांगितले.

वीजपुरवठा करणाऱ्या केंद्रात पाणी गेल्याने दोन दिवसांपासून वसई शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे, तो बुधवारी रात्रीपर्यंतही सुरू झाला नव्हता. त्यामुळे पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे. वीज आणि पाणी नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. ‘‘सोमवार सकाळी गेलेली वीज बुधवारी रात्रीपर्यंत आलेली नव्हती. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. वीज नसल्याने आमच्याकडे पाणी आले नाही. त्यामुळे विहिरीतून पाणी आणावे लागले,’’ असे रमेदी येथे राहणाऱ्या श्यामल वेचलेकर यांनी सांगितले.

छुपा जंगलप्रवेश महागात पडणार

पाऊस सुरू झाल्यावर येऊर येथील घनदाट जंगलात भेंडीनाला धबधब्याकडे पोहण्याच्या उद्देशातून अतिउत्साही तरुण जात असतात. पर्यटकांच्या दृष्टीने जंगलातील हे धबधबे धोकादायक असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात येत आहे. या धबधब्याकडे छुप्या रस्त्याने जाणाऱ्या पर्यटकांवर वन विभागाची करडी नजर असणार आहे. येऊर येथील प्रवेशद्वार, डी.एस.पी. बंगला, म्हातारखिंड, पाटोणापाडा, वनीचापाडा या ठिकाणांहून नागरिक जंगलातील धबधब्याकडे प्रवेश करतात. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागातर्फे पुढील चार महिने सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत वन विभागाचे अधिकारी गस्तीसाठी नेमण्यात येणार आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.

आमच्या घरात पाणी शिरले आहे. इमारतीतही पाणी आलेले आहे. त्यामुळे आम्ही सगळे इमारतीच्या गच्चीवर आश्रय घेतला आहे. लहान मुलांचे खूप हाल होत आहेत.

– हमिदा पटेल, विशाल नगर

मी मुंबईबाहेर होतो. ट्रेन बंद असल्याने मी महामार्गावरून यायचा निर्णय घेतला. पण शहरात सर्वत्र पाणी होते. त्यामुळे वाहतूक बंद होती. मला घरी पोहोचण्यासाठी चार तास लागले.

– निलेश गाला, नालासोपारा

First Published on July 12, 2018 2:53 am

Web Title: situation is worst than 26th july at vasai