News Flash

अग्निशमन सेवेत सहा दुचाकी दाखल

अग्निशमन दलाच्या वाहनांना वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमधून वाट काढत घटनास्थळी पोहचावे लागते.

अग्निशमन दलात दाखल झालेल्या सहा सुसज्ज दुचाकी (छायाचित्र- गणेश जाधव)

ठाण्यातील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये उपयुक्त

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या परिसरातील अरुंद रस्ते आणि डोंगर वस्त्यांमध्ये लागणारी आग विझविण्यासाठी आता अग्निशमन दुचाकींचा वापर करण्यात येणार असून अशा प्रकारच्या सहा दुचाकी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या दुचाकींचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. या दुचाकींमुळे अरुंद रस्ते तसेच डोंगर वस्त्यांमध्ये लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना त्या ठिकाणी लवकरच पोहचणे शक्य होणार असून होणारी मोठी जीवितहानी टाळणेही शक्य होणार आहे.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा परिसरातील अनेक भागांत अरुंद रस्ते आहेत. तसेच या परिसरातील डोंगर भागातही मोठय़ा प्रमाणात वस्त्या आहेत. त्यातच शहरातील विविध भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. अग्निशमन दलाच्या वाहनांना वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमधून वाट काढत घटनास्थळी पोहचावे लागते. त्यामुळे या वाहनांना घटनास्थळी वेळेवर पोहचणे शक्य होत नाही. तसेच डोंगर भागातील अनेक वस्त्यांमधील मार्ग फारच अरुंद असून या मार्गावरून अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही. या अडचणींमुळे आगीत अनेकांचे मोठे नुकसान होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे अग्निशमन विभागाने अशा दाटीवाटीच्या परिसरातील आग विझविण्याकसाठी दुचाकींचा वापर करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता. या निर्णयानुसार महापालिकेने सहा दुचाकींची खरेदी केली असून त्यावर अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा बसविली आहे. ठाणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात या दुचाकी नुकत्याच दाखल झाल्या असून गुरुवारी ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्या हस्ते त्यांचा लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यानंतर या दुचाकी ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या परिसरात अग्निशमन सेवा पुरविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:13 am

Web Title: six bike arrived in fire brigade
Next Stories
1 मिरवणाऱ्या ‘नामधारी’ वाहनांच्या संख्येत वाढ
2 नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी समृद्ध झाले..
3 फुलपाखरांच्या जगात : कॉमन सेलर..
Just Now!
X