वेदांता रिसोस्रेस पीएलसीद्वारा निधी पुरवण्यात येणाऱ्या आणि सामाजिक विकासाकरिता झटणाऱ्या वेदांता फाऊंडेशन या धर्मादाय संस्थेने महाराष्ट्रातील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबातील मुलांकरिता उल्हासनगर येथील ‘वेदांता कॉलेज ऑफ मॅनेजमेण्ट अँड इन्फॉम्रेशन टेक्नोलॉजी’मध्ये इन्फॉम्रेशन टेक्नोलॉजीवरील कौशल्य विकास उपक्रम राबवण्याची योजना आखली आहे. या फाऊंडेशनने कुटुंबांना रजई, साडय़ा आणि कपडय़ांचे वाटप केले. त्यानंतर खेळात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सत्कार केला. त्याचबरोबर पदवीदान समारंभ पार पडला.
या समारंभाच्या वेळी ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी (आयएएस), महापालिका उपायुक्त समीर लेंग्रेकर, पोलीस उपायुक्त वसंत जाधव (आयपीएस), वेदांता फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त डी. पी. अगरवाल, वेदांता फाऊंडेशनच्या विश्वस्त सुमन दिडवानिया आणि ‘वेदांता फाऊंडेशन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लोना लायक हे मान्यवर उपस्थित होते. डी. पी. अगरवाल म्हणाले, वेदांता फाऊंडेशन भारतातील उपेक्षित वर्गातील लोकांकरिता विविध उपक्रम राबवून सामाजिक बदल घडवून आणण्याकरिता प्रयत्न करत आहे. अशा कुटुंबांमधील तरुण मुलांना उज्ज्वल भवितव्याच्या संधी देण्याकरिता असे उपक्रम राबवता असल्याचे समाधान वाटत आहे, असे अगरवाल यांनी सांगितले. या समारंभाच्या वेळी बोलताना सुमन दिडवानिया  म्हणाल्या, हे फाऊंडेशन भारतातील उपेक्षित वर्गातील लोकांकरिता विविध सामाजिक विकास उपक्रम राबवून त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणू इच्छिते. या उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दारिद्रय़ रेषेखालील एक दशलक्ष व्यक्तींच्या आयुष्यांमध्ये सुधारणा करणे, हे या फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत आम्ही देशभरातील दहा लाखांहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.