मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकाबाहेरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढणाऱ्या पादचाऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी एमएमआरडीच्या वतीने रेल्वे स्थानकांबाहेर स्कायवॉकची म्हणजेच आकाशपथांची उभारणी करण्यात आली. मात्र सध्या या स्कायवॉकची दुरवस्था झाली असून हे स्कायवॉक म्हणजे प्रवाशांसाठी बिकटवाट ठरू लागली आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या स्कायवॉकची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. कल्याण स्कायवॉक हा फेरीवाले, गर्दुल्ले आणि घाणीने भरू लागला असून त्यावर वारंवार आग लागण्याच्या घटनाही घडू लागल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंबिवली येथील स्कॉयवॉकच्या छतांचे कामही अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांना उन्हातून मार्गक्रमण करावे लागते. काही ठिकाणी अनेक केबलचा गुंताही स्कॉयवॉकवर आहे. ठाण्याच्या स्कायवॉकवरही अस्वच्छता आणि गर्दुल्ल्यांचा वावर आहे. तसेच जुन्या पुलावर छत नसल्याने स्कायवॉकवरून चालणे म्हणजे शिक्षा असल्याचा भास नागरिकांना होत आहे.