कल्याणमधील चुकांची पुनरावृत्ती टाळल्याचा अभियंत्यांचा दावा
डोंबिवली पश्चिमेतील पंडित दीनदयाळ चौकातील छत बसविलेला स्कायवॉक शुक्रवारपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून स्कायवॉकवर छत टाकण्याचे काम सुरू असल्याने हा स्कायवॉक बंद ठेवण्यात आला होता.
स्कायवॉकवर टेन्साईल फॅब्रिकेट नावाचे कापड बसविण्यात आले आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून हे कापड थोडेही ढळणार नाही, असा दावा अभियांत्रिकी विभागामार्फत करण्यात येत आहे. स्कायवॉकवर गोलाकर पद्धतीने हे कापड टाकण्यात आले आहे. स्कायवॉकच्या दोन्ही बाजू बंदिस्त न करता मोकळ्या ठेवल्यामुळे रस्त्यावरून स्कायवॉकवर कोण उभा आहे, तसेच वरून कोणी कचरा टाकला आहे का हे रस्त्यावरून दिसणार आहे. त्यामुळे भिकारी, गर्दुल्ले यांना या ठिकाणी आश्रय घेता येणार नाही. कल्याणमध्ये स्कायवॉकच्या दोन्ही बाजू बंदिस्त करण्यात आल्यामुळे तेथील फटीत फेरीवाले, विक्रेते, भिकारी, गर्दुल्ले कचरा टाकतात. अनेक वेळा गर्दुल्ले तेथे आडोसा घेऊन नशापान करतात. स्कायवॉकवरच भिकाऱ्यांनी पेटवलेल्या शेकोटीमुळे स्कायवॉकच्या फर्निचर, कचऱ्याला आग लागण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. तो प्रकार डोंबिवलीच्या स्कायवॉकवर टाळण्यात आला आहे, असे उपअभियंता प्रशांत भुजबळ यांनी सांगितले.

सीसीटीव्ही बसविण्याचा विचार

डोंबिवली पश्चिमेतील स्कायवॉकवर लाद्या बसविण्यात आल्या आहेत. वीज बचतीसाठी एलईडी दिव्यांची सोय केली आहे. पाणी, वीज बचत, पर्यावरण संवर्धनाचे संदेश देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात सीसीटीव्ही बसविण्याचा विचार आहे, असे अभियंता भगतसिंग राजपूत यांनी सांगितले.

टेन्साईल फॅब्रिकेट
छत म्हणून वापरण्यात आलेले टेन्साईल फॅब्रिकेट हे चामडय़ाचे आहे.त्यावर कोणीही चालला तरी ते फाटण्याची शक्यता नाही. ऊन, वारा, पावसापासून ते सुरक्षित राहते. या कापडावर जोराने वाजविले तर ढोलासारखा आवाज येतो. छताचे कोपरे कोणत्याही धारदार शस्त्राने तुटणार नाहीत, अशा पद्धतीने छताच्या किनाऱ्याला तारा टाकण्यात आल्या असल्याने सुरक्षित आहे.

सेल्फीसाठी धडपड
चकाचक स्कायवॉक येजा करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक पादचारी स्कायवॉकच्या ठिकाणी येऊन स्वत:ची सेल्फी काढताना दिसत आहेत. ‘प्रथमच एवढा देखणा स्कायवॉक पाहत आहे. आता हा स्कायवॉक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी येजा करणाऱ्या प्रवाशांची आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे,’ असे कुलदीप रावराणे या प्रवाशाने सांगितले.