News Flash

वसईत स्लॅब कोसळून २५ प्रवासी नाल्यात

लोकलच्या गोंधळामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आणि अतिभारामुळे नाल्याचा स्लॅब कोसळल्याचा दावा पालिकेने केला आहे.

नाल्याचा स्लॅब कोसळल्यानंतर नाल्यात पडलेले प्रवासी.

रेल्वे स्थानकाजवळ दुर्घटना; दोन जखमी, प्रवाशांच्या अतिभाराचा परिणाम असल्याचा पालिकेचा दावा

वसई रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकजवळ नाल्याचा स्लॅब कोसळून २५ प्रवासी नाल्यात पडले. त्यातील दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. लोकलच्या गोंधळामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आणि अतिभारामुळे नाल्याचा स्लॅब कोसळल्याचा दावा पालिकेने केला आहे.

वसईच्या फलाट क्रमांक एकवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुटतात. या फलाटाजवळून पालिकेचा मोठा नाला जातो. पालिकेने २० वर्षांपूर्वी बांधलेला हा नाला सात फूट खोल आहे. फलाटावर जाण्यासाठी रेल्वेने छोटे जिने बनवले आहेत. यातील एक जिना या नाल्यावर उतरतो. दीड वर्षांपूर्वी रेल्वेने तो जिना बांधून प्रवाशांसाठी खुला केला होता. मंगळवारी सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल रद्द झाल्याने प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यानंतर ८ वाजून ४० मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलची गर्दी वाढू लागली. जागा अपुरी पडू लागल्याने प्रवासी नाल्यावर उभे राहिले. त्यांच्या वजनाच्या अतिभाराने नाला कोसळला आणि सुमारे २५ हून अधिक प्रवासी नाल्यात पडले. यातील जिग्नेश नायर, मनीष केदारे हे जखमी झाले असून त्यांना आनंद नगर येथील रवी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील आनंद याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे कर्मचारी, पोलीस  घटनास्थळी दाखल झाले.

ठेकेदारावर कारवाईची मागणी

हा नाला पूर्वी उघडा होता. डासांचा प्रादुर्भाव आणि दरुगधी होऊ नये यासाठी १९९६ मध्ये हा नाला बंदिस्त केल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. नाल्यावर दुचाकी पार्क केलेल्या असतात. प्रवाशांच्या अतिभाराने स्लॅब कोसळला, असा दावा पालिका करत असली तरी ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचा आरोप रहिवाशांनी केला.ठेकेदारावर गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:25 am

Web Title: slab collapsed at vasai railway station
Next Stories
1 पोलीस शिपायाचे अपहरण
2 सामान्यांच्या ताटातील कोशिंबीर महाग
3 ‘इफ्रेडीन’ तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीला नेपाळमधून अटक
Just Now!
X