News Flash

आणखी एक तलाव मरणपंथाला

परिसरातील नागरिकांकडून तलावात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे.

|| आशीष धनगर

रायलादेवी तलावाचे पाणी डिसेंबरमध्येच आटले; तलावात गाळ आणि कचऱ्याचे ढीग :– ठाणे शहरातील तलावांच्या सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोटय़वधी रुपयांचा रतीब मांडण्याची तयारी एकीकडे ठाणे महापालिका प्रशासनाने केली असताना वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या परिसरातील नागरिकांकडून तलावात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने तलावातील गाळ दिवसागणिक वाढत असून यामुळे डिसेंबर महिन्यातच तलावाचे पाणी आटल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

तलावांचे शहर अशी ओळख असणाऱ्या ठाणे शहरातील पूर्वी असलेल्या ७० तलावांपैकी सध्या केवळ ३३ तलाव अस्तित्वात आहेत. दरवर्षी शहरातील तलावांवर महापालिका दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा खर्च करत असते. असे असताना मासुंदा, उपवन, कचराळी, ब्रह्माळा असे निवडक तलाव सोडल्यास इतर तलावांची अवस्था बिकट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील वागळे इस्टेट भागात रायलदेवी तलावात मोठय़ा प्रमाणात जीवसृष्टी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या तलावाच्या देखभालीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने तो मरणपंथाला आला आहे.

परिसरातील नागरिकांकडून तलावात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे तलावात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या तलावाची सफाई करण्यात आलेली नाही.  तलावाचा संरक्षक कठडाही धोकादायक झाला असून नागरिकांना बसण्याची जागाही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

तलावातील जीवसृष्टीला धोका

रायलादेवी तलावात विविध प्रकारचे मासे, पाणकावळे, राखी बगळे काही वर्षांपूर्वी पाहायला मिळत होते. मात्र, तलावाची दुरवस्था झाल्यामुळे पाण्यातील मासे कमी झाले आहेत. त्यामुळे पाणकावळे आणि बगळेही तलावाच्या काठी दिसेनासे झाले आहेत. तसेच तलावाच्या काठी गोरखचिंच या पोर्तुगीजांनी भारतात आणलेली काही दुर्मीळ जातीची झाडे आहेत, तर बदामाच्या आकाराची पाने असलेले हळदू ही दुर्मीळ झाडेही आहेत. मात्र, तलावाची दुरवस्था होत असल्याने तलावाच्या परिसरात असणारी ही वृक्षसंपदा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे पर्यावरण अभ्यासक सम्राट गोडांबे यांनी सांगितले.

रायलादेवी तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. या तलावाच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. – संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका.

रायलादेवी तलावात गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत पाणी शिल्लक होते. मात्र, तलावातील गाळ वाढल्याने यंदा डिसेंबरपासूनच पाणी आटू लागले आहे. तसेच पाणी प्रदूषित झाल्याने तलावातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला  आहे. – ऋषभ चौधरी, पर्यावरण अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:03 am

Web Title: sludge and waste piles in the pond akp 94
Next Stories
1 रब्बी पिकांवर ‘अवकाळीचे ग्रहण’
2 ठाण्यातील सांस्कृतिक कट्टय़ांवर विज्ञान, भटकंतीच्या गप्पा
3 टिटवाळ्यात भटक्या कुत्र्यांचा आठवडाभरात २० पादचाऱ्यांना चावा
Just Now!
X