इंदिरानगरमधील झोपडय़ा रंगवण्याच्या निर्णयावर रहिवाशांची नाराजी

चिखलांचे रस्ते, पदपथांची वानवा, पाण्यासाठी परवड, अस्वच्छ शौचालय अशा अनेक समस्यांशी इंदिरानगर येथील नागरिक गेले अनेक वर्ष झुंज देत आहेत. अकार्यक्षम प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आजही हा भाग अत्यंत बकाल अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत पालिका आयुक्तांनी पायभूत सुविधांकडे पाठ फिरवत झोपडपट्टीला रंगरंगोटी करण्याचा घाट घातल्याने येथील नारिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ‘आधी सुविधा द्या, मग झोपडय़ा रंगवा,’ असे येथील रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

ठाण्यातील अनेक भागांचा विकास होत असताना वागळे इस्टेट येथील इंदिारानगर भागासारख्या झोपडपट्टय़ांकडे पालिकेने ढुंकुनही पाहिलेले नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात गेले अनेक वर्ष शिवसेनेचे नगरसेवक निवडून येत होते. मात्र तरीही या भागात कोणताही बदल न झाल्याने यंदा नागरिकांनी सत्ता भाजपाला दिली. असे करूनही त्यांच्या आसपासच्या परिस्थितीत तीळमात्र फरक न झाल्याने येथील नागरिक आता हतबल झाले आहेत. संपूर्ण शहरात काँक्रिटीकरणाचे पेव फुटले असून येथेही पक्का रस्ता करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट खोदलेल्या रस्त्यावरून येथील नागरिक ये-जा करत आहेत. रस्त्याच्या कामांमुळे येथील काही जलवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सतत पाण्याची गळती होत असते. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून अनेकदा या ठिकाणी अपघात होता.

पाण्याच्या वेळा निश्चित नसल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत. याठिकाणी कचराकुंडय़ां नसल्याने जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पहायला मिळते. अशा बकाल अवस्थेत अंतर्गत सुविधांकडे पाठ फिरवत बारूप सजवण्याच्या पालिकेचा प्रयत्न किती योग्य आहे, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.