News Flash

अखेर पाण्यानेच तिचा बळी घेतला..

ठाणे शहरातील वर्तकनगर भागातील भीमनगर परिसरात दयानंद वाघमारे राहतात.

दुष्काळग्रस्त कुटुंबातील चिमुरडीचा ठाण्यात पाण्याच्या टबमध्ये मृत्यू

पाण्यासाठी मैलोन्मैल करावी लागणारी पायपीट आणि दुष्काळामुळे होणारी उपासमार टाळण्यासाठी ठाण्यात वास्तव्याला आलेल्या दयानंद वाघमारे यांच्या कुटुंबाचा अखेर पाण्यानेच घात केला. ठाणे शहरातील पाणीकपातीला तोंड देण्यासाठी वाघमारे कुटुंबाने घरात पाण्याचे टब भरून ठेवले, पण याच टबमध्ये पडून त्यांची एक वर्षांची मुलगी एकता हिचा मृत्यू झाला. एकताचा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे वाघमारे कुटुंबीय गावी जाणार होते, मात्र त्याच्या एक दिवस आधीच तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ठाणे शहरातील वर्तकनगर भागातील भीमनगर परिसरात दयानंद वाघमारे राहतात. पत्नी, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. ते मूळचे लातूर जिल्हय़ातील थोडगा गावचे रहिवाशी आहेत.

यंदा कमी पावसामुळे गावात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी वाघमारे कुटुंबीय गाव सोडून ठाण्यात आले. ठाणे शहरातील भीमनगर परिसरात ते राहतात. हाऊसकीपिंगचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मोठय़ा मुलीला कावीळ झाली असून तिच्यावर ठाण्यात उपचार सुरू होते, मात्र उपचारामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे ते पुन्हा गावी जाणार होते. सोमवारी सायंकाळीच्या गाडीने ते गावी जाणार होते. तसेच त्यांची लहान मुलगी एकताचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता. त्यामुळे तिचा वाढदिवसही गावीच साजरा करण्याचे बेत त्यांनी आखले होते.

दरम्यान, सोमवारी दयानंद वाघमारे कामावर गेले होते, तर त्यांची पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्या वेळी एकता घरामध्ये एकटीच होती. ठाण्यातील पाणीकपातीच्या पाश्र्वभूमीवर घरातील भांडय़ांमध्ये पाणी साठवून ठेवण्यात येते. अशाच प्रकारे वाघमारे दाम्पत्याने टबमध्ये पाणी साठवून ठेवले होते. या टबमध्ये एकता पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. दयानंद यांची पत्नी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पहिल्या वाढदिवसाआधीच बळी

एकताचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता. त्यामुळे तिचा वाढदिवसही गावीच साजरा करण्याचे बेत त्यांनी आखले होते. मात्र, वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच पाण्याने एकताचा बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 3:10 am

Web Title: small girl death in thane due to fall in water tub
टॅग : Thane
Next Stories
1 विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे डावखरेंना आव्हान, रविंद्र फाटक यांना उमेदवारी
2 ठाण्याच्या पुनर्विकासाला पुन्हा खीळ?
3 २७ गावांतील संघर्ष समितीचा वसंत डावखरेंना पाठिंबा
Just Now!
X