व्यवसाय १० टक्क्यांवर; बचतगट उपक्रमातून खानावळ चालवणाऱ्या महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

लोकसत्ता प्रतिनिधी

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

विरार : करोनामुळे सुरू झालेल्या टाळेबंदीचा सर्वात मोठा फटका संपूर्ण हॉटेल उद्योगाला बसला आहे. उपाहारगृहात केवळ खाद्यपदार्थ पार्सल नेण्याची परवानगी असल्याने त्यांचा व्यवसाय १० टक्क्यांवर आला तर खानावळी आणि डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक छोटी उपाहारगृहे, खानावळी बंद पडत असून याचा फटका महिलावर्गाला मोठा बसला आहे. बचत गट आणि इतर उपक्रमांतून खानावळी चालवणाऱ्या हजारो महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. तर कर्जाच्या ओझ्याखाली अनेकांनी आपले व्यवसाय गुंडाळले आहेत.

वसई-विरार शहरात साडेपाचशे उपाहारगृहे आणि परमिट रूम (बार) आहेत. त्यात ३८० उपाहारगृहे आणि १२३ बार अँण्ड रेस्टॉरेंट आहेत. २२ मार्चपासून राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली. त्यामुळे उपाहारगृहे आणि बार बंद आहेत. सध्या त्यांना सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी परवानगीच्या जाचक अटींमुळे व्यवसाय अधिकच अडचणीत आले आहेत. यात सर्वाधिक फटका महिला बचत गटातून चालणाऱ्या खानावळी आणि घरातून डबे पोहोचविणाऱ्या महिलावर्गाला बसला आहे. कारण सध्या पार्सल जेवण नेणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

सध्या करोना टाळेबंदीमुळे अनेक कंपन्या बंद असल्याने अनेकांचे रोजचे डबे बंद झाले आहेत. छोटय़ा खानावळी, कॅण्टीन बंद आहेत. शहरातील औद्योगिक वसाहती, व्यावसायिक संकुले,कामगार वसाहती, रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी अनेक लहान खानावळी आणि कॅण्टीन आहेत. त्यांच्याकडे येणारे ग्राहक आता बंद झाले आहेत. त्यामुळे अशा कामगारवर्गाने खानावळींकडे पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे कॉलेज आणि वसतिगृहेसुद्धा ओस पडल्याने विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे बंद झाले आहेत. तर अनेकांचे पैसेच आले नसल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे या खानावळी बंद झाल्या आहेत. या खानावळीत काम करणाऱ्या गृहिणींचा रोजगार बंद झाला आहे.

वसई-विरारमध्ये २०० हून अधिक महिला या खानावळी चालवत आहेत. यात हजारो महिलांचा रोजगार सुरू होता. पण अचानक आता करोनामुळे सर्वच बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर अनेक महिला या आपल्या घराचे काम सांभाळून जेवणाचे डबे तयार करून आपला संसाराचा गाडा हाकत होत्या, पण आता हेसुद्धा बंद झाल्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. यात अनेक महिलांच्या खानवळी या भाडय़ाच्या गाळ्यात चालत असल्याने त्याचे भाडे थकले आहे. यामुळे या महिला मोठय़ा आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

आम्ही महिला बचत गटाच्या मार्फत विरारमध्ये खानावळ सुरू केली होती. मागील ६ वर्षांपासून आमच्याकडे १२ महिला काम करत होत्या, पण आता करोनामुळे सारच उद्ध्वस्त झाले. आम्ही शासनाची परवानगी मिळाल्यानंतर पार्सल सेवा सुरू केली. पण ग्राहकच नसल्याने आम्ही २ दिवसांतच बंद केले. त्यात भांडवलसुद्धा निघत नव्हते. आत आम्ही सर्व महिला बेरोजगार आहोत

–  सुवर्णा भिस, आई जीवदानी महिला खानावळ, विरार

मी एक गृहिणी असून जेवणाचे डबे तयार करण्याचे काम करत होते. पण करोनाकाळात माझा व्यवसाय बुडाला आहे.

– आशा पाटील, गृहिणी