प्रकल्पासाठी तज्ज्ञाची नेमणूक

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध प्रकल्पांची आखणी करण्यात आली असतानाच आता महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात नळजोडण्यांसाठी स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरांमध्ये पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोतांचे पाणी व ऊर्जा लेखा परीक्षण करण्यात येणार असून शहरामध्ये ठिकठिकाणी पाणपोई (वॉटर किऑस्क) उभारण्यात येणार आहेत.  याशिवाय, उथळसर प्रभाग समितीच्या क्षेत्रात २४ तास पाणीपुरवठा करण्यासंबंधीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी महापालिका प्रशासनाने तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला असून त्यास गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराची निवड व्हावी म्हणून महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षांपासून विविध प्रकल्पांची आखणी केली होती. त्यापैकी काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. असे असतानाच गेल्या आठवडय़ात स्मार्ट सिटी योजनेत ठाणे शहराची निवड झाली असून त्या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आखलेल्या प्रकल्पांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने योजना आखल्या आहेत. यासंबंधीचा एक प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी सादर केला होता. या प्रस्तावानुसार संपूर्ण शहरातील पाण्याच्या टाक्या तसेच या टाक्यांपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विद्युत उपकरणांचेही लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शहरात पाणीपोईंची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय, संपुर्ण शहरातील नळजोडण्यांवर स्मार्ट वॉटर मीटर बसविण्यात येणार आहेत. याशिवाय, उथळसर प्रभाग समितीच्या क्षेत्रात २४ तास पाणीपुरवठा करण्यासंबंधीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचा हा प्रस्ताव होता. त्यामध्ये मे. डीआरए कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा लघुत्तम दराची असल्यामुळे त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

बेसुमार पाणी वापराला लगाम

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरातील विविध भागांमध्ये नळजोडण्यांवर मीटर बसविण्यात आलेले नसून पाण्यासाठी ठरावीक रक्कम आकारली जाते. त्यामुळे शहरांमध्ये पाण्याचा बेसुमार वापर होताना दिसून येतो. याच पाश्र्वभूमीवर संपूर्ण शहरातील नळजोडण्यांवर  स्मार्ट वॉटर मीटर बसविण्यात येणार आहेत. मीटर पद्धतीमुळे बेसुमार पाणी वापरावर काहीसा लगाम बसण्याची शक्यता आहे.