‘फलाट क्रमांक तीनपासून लांब उभे रहा, एक जलद गाडी जाणार आहे. कुणीही रेल्वे रुळ ओलांडू नका.’ अशा रेल्वेच्या आवारात ऐकू येणाऱ्या उद्घोषणा जर वाहतूक सिग्नलवर ऐकू आल्या तर रस्त्यांवर होणारे अपघात टळतील. सिग्नल शाळेत शिकणाऱ्या दशरथ पवार, किरण काळे आणि समीर पवार या मुलांची ही संकल्पना!  महानगर पालिका आयोजित शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांनी सिग्नलवरील वाहतूक आणि रस्ते अपघात या गंभीर समस्येवर स्मार्ट मॉडेल तयार केले आहे.

ठाण्यातील तीनहात नाक्यावर प्रतिकुल परिस्थितीत जगणाऱ्या १४ कुटुंबातील मुले सिग्नल शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेत विविध विषयांसोबतच कला, संगीत, मूल्यशिक्षण, नृत्य अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. महानगर पालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याचे सिग्नल शाळेचे हे दुसरे वर्ष आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत सिग्नलवरील वाहतूक आणि रस्ते अपघात या गंभीर समस्येवर मुलांनी एक मॉडेल तयार केले आहे. सिग्नल यंत्रणेला सेन्सर सारखी एखादी गोष्ट जोडण्याच संकल्पना मांडण्यात आली आहे.

‘रद्दी पेपर स्क्रब’ या समाजभावनेने एकत्र आलेल्या महाविद्यालयीन तरूणांच्या गटाने स्मार्ट सिग्नलचे मॉडेल तयार करण्यास मदत केली आहे. तसेच रोबोटिक्स टीमच्या सहाय्याने मुलांनी या मॉडेलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या प्रकल्पात सुमन शेवाळे, श्रद्धा दंडवते, दुर्गा खुरकुटे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.

अशी आहे प्रणाली

सिग्नल सुरू असताना कोणतीही व्यक्ती रस्ता ओलांडत असेल तर त्याची आकृती या सेन्सरवर दिसून एक भोंगा वाजेल. त्यामुळे रस्ता ओलांडणाराही सावध होईल. कोणताही प्राणी रस्ता ओलांडत असेल तर भोंगा वाजल्यानंतर वाहतूक पोलीस त्याची मदत करू शकतील. यामुळे अपघात टळू शकतात. कमी खर्चिक असलेल्या या स्मार्ट सिग्नल  प्रकल्पाने जीव वाचवण्यास मदत होईल, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.