12 December 2018

News Flash

कल्याणकरांचा श्वास कोंडला!

कल्याण खाडीजवळील आधारवाडी येथील क्षेपणभूमीला शुक्रवारी लागलेली आग अजूनही धुमसते आहे.

कचराभूमीच्या आगीमुळे कल्याणमध्ये दिवसभर धुरकट वातावरण होते.

आधारवाडी कचराभूमीच्या आगीमुळे शहरभर धूर; नागरिकांना श्वसनविषयक तक्रारी

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कचराभूमीला लागलेल्या आगीची धग सलग चौथ्या दिवशीही कायम असून यामुळे कल्याण, टिटवाळा आणि आसपासची शहरे धुरामुळे अक्षरश कोंडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असले तरी यामध्ये म्हणाव्या त्या प्रमाणावर यश येत नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकही धूरमय झाल्याने प्रवाशांनाही नकोसे झाले आहे. सातत्याने लागणाऱ्या या आगींमुळे संतापलेल्या कल्याणकरांनी रविवारी एकत्र येत स्थानिक आमदार, खासदार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने या मुद्दय़ावरून राजकीय वातावरणही तापू लागले आहे.

कल्याण खाडीजवळील आधारवाडी येथील क्षेपणभूमीला शुक्रवारी लागलेली आग अजूनही धुमसते आहे. शुक्रवारी सायंकाळी आग लागताच अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा बंब आणि पाण्याचे टँकर घेऊन त्वरित क्षेपणभूमीकडे धाव घेतली. मात्र आगीची तीव्रता पाहता या गाडय़ा अपुऱ्या पडत असल्याने १५ खासगी टँकर मागविण्यात आले. मात्र ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी क्षेपणभूमीवर अक्षरश कचऱ्याचा भला मोठा डोंगर निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या काळात कचरा कुजून त्यामध्ये तयार झालेल्या ज्वलनशील वायूमुळे वारंवार आग लागण्याचे प्रकार घडतात. मात्र तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या वेळी लागलेली आग अत्यंत तीव्र असून यामुळे संपूर्ण शहरात धुरात काळवंडल्याचे चित्र दिसू लागले आहे. रविवारी शिवाजी चौक, कल्याण रेल्वे स्थानक परिसरसही धूरमय झाला होता. या वाढत्या धुरामुळे परिसरातील रहिवाशांना घशाचे आजार होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. आधारवाडीच्या आगीचा एरवी कल्याण पूर्व भागातील रहिवाशांना फारसा त्रास जाणवत नाही. यंदा मात्र धुराचे लोट या भागातही दिसू लागल्याने तेथील रहिवाशांमध्येही अस्वस्थता आहे. दरम्यान, संतप्त रहिवाशांनी रविवारी रात्री आंदोलन करीत लोकप्रतिनिधींविरोधात घोषणा दिल्या. यामुळे या भागातील वातावरण काही काळ तापले होते.

 

First Published on March 13, 2018 3:06 am

Web Title: smoke across kalyan city due to fire at adharwadi dumpyard