गेल्या महिनाभरात २७ घटनांची नोंद
गीता कुळकर्णी, लोकसत्ता
ठाणे : टाळेबंदीच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने शहरांमध्ये सर्वत्र शांतता पसरली आहे. त्यातच तापमान वाढू लागल्याने जमिनीत दडून बसलेले सर्प आता बाहेर पडू लागले आहेत. टाळेबंदी सुरू झाल्यापासून १४ एप्रिलपर्यंत ठाणे शहरात मानवी वस्तीत, गृहसंकुलांत, रस्त्यांवर साप आढळल्याच्या २७ घटना समोर आल्या आहेत. अशा सर्पाना पकडून त्यांची सुरक्षित स्थळी रवानगी करणाऱ्या प्राणिमित्रांच्या हातांना त्यामुळे टाळेबंदीतही काम लाभले आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू झालेल्या टाळेबंदीमुळे गेले चार आठवडे महानगरांतही शुकशुकाट आहे. त्यामुळे रस्ते, मैदाने, उद्याने ओस पडली आहेत. मानवासाठी ही शांतता अस्वस्थ करणारी असली तरी अन्य प्राणिमात्रांसाठी ती पथ्यावर पडत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या नागरी वसाहतींमध्ये घार, पोपट अशा पक्ष्यांचा वावर वाढला आहे. तर काही भागांत सापही नजरेस पडत आहेत. २१ मार्च ते १४ एप्रिल या काळात शहारातील वागळे इस्टेट, येऊर, शिवाईनगर, वर्तकनगर, गावंडबाग, माजिवडा, रौनक पार्क, कळवा अशा विविध भागांतील गृहसंकुलांत विविध प्रजातींचे २७ साप आढळले आहेत. या सापांमध्ये नाग, रुका, कवडय़ा, अजगर, हरणटोळ आणि धामण या प्रजातींच्या सापांचा सामावेश आहे. गृहसंकुलात साप आढळल्यानंतर नागरिक वर्ल्ड वाइल्ड लाइफ असोसिएशन या संस्थेला फोन करत असून या संस्थेचे सदस्य गृहसंकुलातून सापांना पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडत आहेत. शहरात सापांचा सुळसुळाट वाढल्याने टाळेबंदीच्या काळातही प्राणिमित्र घराबाहेर पडत असून प्राण्यांचा जीव वाचवत आहेत.
संचारबंदीमुळे एकटे कासव घरात
संचारबंदीपूर्वी नौपाडा येथील एक व्यक्ती काही कारणास्तव ठाण्याबाहेर गेली असता त्यांनी पाळलेल्या कासवाला घरी ठेवले होते. ती व्यक्ती एका दिवसात परतणार होती. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे त्या व्यक्तीला घरी परतणे शक्य झाले नाही, त्यामुळे या व्यक्तीने वर्ल्ड वाइल्ड लाइफ असोसिएशन या संस्थेला संपर्क साधून घरी एकटा आणि उपाशी असलेल्या कासवाची माहिती दिली. संस्थेने ते कासव ताब्यात घेतले असून टाळेबंदी संपेपर्यंत त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली आहे
पाण्याअभावी पक्ष्यांची प्रकृती गंभीर
उन्हाच्या झळा तापू लागल्याने शहरातील विविध पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पक्ष्यांना निर्जलीकरणाचा त्रास होत असून त्यांचे स्वास्थ्य बिघडत आहे. टाळेबंदीच्या काळात पोपट, घार, चिमणी आणि कावळा अशा विविध प्रकरारच्या सहा पक्ष्यांचे जीव प्राणिमित्रांनी वाचवले असल्याचे वर्ल्ड वाइल्ड लाइफ असोसिएशन या संस्थेचे आदित्य पाटील यांनी सांगितले.
२१ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत सापडलेल्या सापांची संख्या
’ धामण – १४ ’ नाग – ५ ’ रुका – २ ’ कवडय़ा – २ ’ पाण्यातील साप – २ ’ अजगर – १
’ हरळटोळ – १
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 1:06 am