News Flash

अंबरनाथमध्ये करोनामुळे आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू

शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के, तर मृत्यूदर ३.९२ टक्के

(संग्रहित छायाचित्र)

शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के, तर मृत्यूदर ३.९२ टक्के

अंबरनाथ : जिल्ह्याकरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना अंबरनाथ शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्कय़ांवर पोहोचल्याने समाधान व्यक्त होत होते. मात्र, शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचा आकडाही आता शंभरी पार झाला असून जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहरामध्ये रविवार सायंकाळपर्यंत १०५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील मृत्यूदर ३.९२ टक्के असला तरी मृतांची संख्या शंभरपार गेल्याने नागरिकांकडून आता चिंता व्यक्त होत आहे.

अंबरनाथ शहरातील करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसात झपाटय़ाने वाढत आहे. सुरुवातीला अंबरनाथच्या पश्चिम भागातील बैठय़ा चाळी आणि झोपडपट्टीसदृश भागात करोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले होते. मात्र, आता शहरातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सोमवापर्यंत शहरातील रुग्णसंख्या २ हजार ६७४ होती, तर शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल २ हजार १६१ होती. त्यामुळे शहरातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही ८० टक्कय़ांच्या वर गेल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण अंबरनाथमध्ये आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही शंभरीपार गेला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवापर्यंत अंबरनाथमध्ये १०५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर रविवारी एकाच दिवसात ८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शेजारील अत्यंत दाटीवाटीच्या अशा उल्हासनगर शहरात करोनाबाधितांची संख्या ४ हजारांच्या वर गेली असली तरी तेथील मृतांचा आकडा अद्यापही दोन अंकी आहे. सोमवापर्यंत उल्हासनगरात ६७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर बदलापुरातही मृतांचा आकडा २० आहे. मात्र, अंबरनाथ शहरात रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असतानाही मृत्यूंची संख्या वाढत आहे.

आकडय़ांमध्ये तफावत

ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये अंबरनाथमध्ये १०५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, तर अंबरनाथ नगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीत आतापर्यंत केवळ ८८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत गोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:32 am

Web Title: so far 100 people died in ambernath due to coronavirus zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना रुग्ण सेवा कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच
2 जिल्ह्य़ातील पोलीस दल करोनाच्या विळख्यात
3 कोविड रुग्णालयांच्या निर्मितीस दिरंगाई
Just Now!
X