भाजपमधील कलहावर उद्धव यांची टिप्पणी
बिहारमधील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ‘लेटरबॉम्ब’ फोडला असला तरी भाजपत अजून बरीच ‘बॉम्बा बोम्ब’ बाकी असल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कल्याण येथे पत्रकार परिषदेत केले. बिहार निवडणुकांबद्दल आता काही बोलायचे नसल्याचे सांगतानाच नितीशकुमार यांच्या शपथविधीला जायचे की नाही, हे अद्याप ठरविले नसल्याचे सांगत ते मुंबईत आल्यास त्यांची भेट नक्की घेऊ, असे ते म्हणाले.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे कौतुक करण्यासाठी ठाकरे पालिका मुख्यालयात आले होते.
कल्याण डोंबिवलीकरांना विकास हवा आहे. त्यामुळे आम्ही युतीचा निर्णय घेतला. यापूर्वी काय घडले, कोणते आरोप प्रत्यारोप झाले यापेक्षा येत्या पाच वर्षांत युतीच्या माध्यमातून अधिक विकासकामे करून चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी निवडणुकीपूर्वी सुमारे ६५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. हा निधी आणण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.