ठाण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डय़ांची चाळण; महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
महापालिकेच्या अनास्थेमुळे यंदा ठाणे शहरात रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. ठाणेकरांचा अपघातमुक्त प्रवास व्हावा, यासाठी महापालिकेने ‘स्टार ग्रेड’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन सुरू केले असून त्यावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या आधारे शहरात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, याव्यतिरिक्त ज्या रस्त्यांच्या तक्रारी येत नाहीत, त्या रस्त्यांवरील खड्डय़ांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला तरी १५ दिवसांत संपूर्ण शहर खड्डेमुक्त होणे अशक्यच आहे. त्यामुळे यंदा गणरायाचे आगमन खड्डय़ांतूनच होण्याची चिन्हे आहेत.
पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे सक्त आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार शहरातील बहुतेक रस्ते खड्डेमुक्त झाले होते. मात्र, जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामध्ये रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले होते. त्यानंतर महापालिकेने पुन्हा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांची तात्काळ माहिती मिळावी आणि अवघ्या काही तासांत तो खड्डा बुजवून संभाव्य अपघातांना आळा बसावा, या उद्देशातून महापालिकेने ‘स्टार ग्रेड’ नावाच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची सुविधा ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिली. या अ‍ॅपवर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या आधारे शहरातील खड्डे बुजविण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. असे असले तरी ज्या रस्त्यांच्या तक्रारी येत नाहीत, त्या रस्त्यांवरील खड्डय़ांकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तीन हात नाका, नितीन कंपनी या दोन्ही मुख्य जंक्शनसह वागळे इस्टेट भागातील अंतर्गत रस्ते, कोपरी, कळवा, मुंब्रा आदी भागांतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र असून या खड्डय़ांमधून वाहन चालविताना चालकांना तारेवरची करसत करावी लागत आहे.
या संदर्भात ठाणे महापालिकेचे शहर अभियंता रतन अवसरमोल यांच्याशी संपर्क साधला असता, ‘स्टार ग्रेड’ अ‍ॅपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय प्रत्येक प्रभाग समितीमार्फत रस्त्यावरील खड्डय़ांची पाहाणी करून बुजविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात शहरातील सर्वच खड्डे बुजविण्यात येतील, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

‘मुंब्रा बाहय़वळण मार्गावरील खड्डे बुजवा’
मुंब्रा बाहय़वळण मार्गावर खड्डे पडले असून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पाश्र्वभूमीवर या मार्गावरील खड्डे तात्पुरते न बुजविता त्याचे भूपृष्ठीकरणाचे कामही तातडीने हाती घ्या, तसेच या मार्गावरील अपघातांच्या ठिकाणी काँक्रीटची संरक्षक भिंत उभारा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

‘अ‍ॅप’वर ३१८ तक्रारी
ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या ‘स्टार ग्रेड’ अ‍ॅपवर आतापर्यंत ३१८ तक्रारी आल्या असून त्यापैकी ७८ चुकीच्या तसेच खोटय़ा तक्रारी आहेत. उर्वरित ३९ इतर विभागांशी संबंधित, तर ४० तक्रारी खड्डय़ांसंबंधी आहेत.
२९ तक्रारींवर कार्यवाही सुरू असून १३२ तक्रारी निकालात काढण्यात आल्या आहेत. ३१८ तक्रारींमध्ये नौपाडा विभागातील सर्वाधिक तक्रारी असून त्याचा आकडा ८६च्या घरात आहे. उर्वरित विभागांमध्ये मात्र त्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण निम्मे आहे.