समाजसेवा मंडळ

समाजप्रबोधन, कालसुसंगत बदल, आधुनिक विचारसरणी आणि व्यापक दूरदृष्टीपणा या बाबी डोळ्यांसमोर ठेवून १९५८ साली काही सेवाभावी लोकांनी एकत्र येऊन समाजसेवा मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. अशिक्षितपणामुळे समाजात असलेल्या अंधश्रद्धा, कालबाह्य चालीरीती, भेदभाव, गरीब असलेल्या समाजात चालणारे अनेक दिवसांचे लग्नसोहळे आणि त्यातून निर्माण झालेला कर्जबाजारीपणा, होतकरू गरीब विद्यार्थ्यांना असलेली शैक्षणिक मदतीची गरज अशा विविध समस्यांना समोर ठेवून ‘समाजसेवा मंडळा’ने सामाजिक प्रबोधन केले आहे.

६० वर्षांपूर्वी कुपारी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती होता. समाजात शिक्षणाचा खूप अभाव होता. आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. अगदी थोडे तरुण एसएससीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबई येथे नोकरीस लागले. परंतु सोयीस्कर अशा नोकऱ्या नव्हत्या, त्याचबरोबर समाजाची मध्यवर्ती संस्था नव्हती. यावेळी समाजातील काही विचारवंतांनी समाजाची मध्यवर्ती संघटना उभी करण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन याबाबत चर्चा करून ‘उत्तर वसई कॅथोलिक मंडळा’ची स्थापना १९ जानेवारी १९५८ साली करण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या दुसऱ्या सभेत मंडळाचे नाव ‘उत्तर वसई कॅथोलिक मंडळ’ असे एकमताने ठरवण्यात आले. नंदाखाल येथे मंडळाच्या दुसऱ्या सभेत येथील विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण फंड स्थापन करण्यात यावा, असे ठरले. स्वेच्छा वर्गणी, लॉटरी, नाटक या उपक्रमातून निधी उभा करण्यात आला. त्यानुसार डीएड् आणि पदवीधर विद्यार्थ्यांना परतफेडीच्या तत्त्वावर शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात सुरुवात झाली. सुरुवातीला डीएड विद्यार्थ्यांना १५० रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रुपये शिष्यवृत्ती लेखी आणि हमी तत्त्वावर देण्यात आल्या. त्यानंतर मंडळाचा कार्यविस्तार वाढत गेला. मंडळाची नोंदणी करण्यासाठी देगू डाबरे यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे ‘समाजसेवा मंडळ उत्तर वसई’ या नावाने ९ डिसेंबर १९६१ मध्ये नोंदणी केली. त्यावेळी नंदाखाल येथील दोन तलाव येथे झालेल्या सभेत मिंगू पेद्रु दमेल यांच्या अध्यक्षतेपदी आणि बावतीस डाबरे यांची सरचिटणीसपदी निवड झाली. उमराळे धर्मग्रामात बिशप लॉन्जिनीस परेरा यांच्या अध्यक्षतेखाली पहिले अधिवेशन झाले. त्यानंतर समाजाने निर्मळ येथे नवीन स्मृतिभवन उभे केले.

समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजसेवा मंडळाने सुरुवातीला अनेक प्रयत्न केले. मंडळाचे नाव समाजसेवा मंडळ असले तरी प्रत्यक्षात ते समाजसुधारक मंडळ होते. समाजसेवेऐवजी समाज सुधारण्याचे व्रत या मंडळाने हाती घेतले. शिक्षणाच्या रुतलेल्या गाडय़ाला गती देण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करणे, बक्षीस व शिष्यवृत्तीद्वारे होतकरू विद्यार्थ्यांंना प्रोत्साहन देणे, उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे यांबरोबर अपंगांना साहाय्य करणे, दारिद्रय़ाकडे घेऊन जाणाऱ्या निर्थक चालीरीतींचे उच्चाटन करणे यांसारखी कामे मंडळाने प्रामुख्याने हाती घेतली होती. त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषा बदलून त्याऐवजी सुटसुटीत मराठमोळ्या वेशभूषेचा आग्रह धरण्यावरही मंडळाने बऱ्यापैकी भर दिला होता. मंडळाच्या या बदलांना अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला तरी सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. लाल लुगडे आणि गळा-कानभर दागिने या वेशभूषेचा त्याग करून प्रथम नऊवारी लुगडे आणि नंतर पाचवारी पातळ या वेशभूषेला मोठय़ा प्रमाणात पसंती दिली होती.

प्रारंभी सुमारे २०-२५ वर्षे समाजसेवा मंडळाने उल्लेखनीय असे भरीव कार्य केले. समाजसेवा मंडळाचे दुसरे अधिवेशन २६ जानेवारी १९६५ रोजी नंदाखाल येथे झाले. त्यावेळी इनास डिसोजा हे अध्यक्षपदी आणि पीटर रॉड्रिग्ज हे सरचिटणीस होते. मंडळाचे तिसरे अधिवेशन १४ डिसेंबर १९६९ मध्ये उमराळे येथे भरविण्यात आले, तर चौथे निर्मळ येथे १९८६ मध्ये झाले. २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी सुनील रॉड्रिग्ज यांची अध्यक्षपदी संदीप फिगेर यांची सरचिटणीसपदी निवड झाली असून त्यांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांसारखे विविध कार्यक्रम राबवले आहेत. २०१७-१८ हे मंडळाचे हीरक महात्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्तदेखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, तसेच पुढे शिक्षण, शेती-बागायती, उद्योग आणि आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात समस्या आहेत. यासाठी समाजसेवा मंडळाने पुन्हा एकदा कंबर कसली असून परिवर्तनाचा ध्यास पुढे चालू ठेवत नवनवीन उपक्रम राबवण्याचा मंडळाचा मानस आहे.

वैष्णवी राऊत vaishnavi.raut.50@gmail.com