विविध ठिकाणी उपस्वागतयात्रा; परंपरेचे दर्शन, मतदान जागृतीसाठी दुचाकी फेरी

यंदा ठाणे शहरातील स्वागतयात्रेत विविध सामाजिक संदेश देणारे ४५हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. पारंपरिक पोषाखात नागरिक सहभागी होणार आहेत. स्वागतयात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात येणार आहे. याशिवाय शहराच्या अन्य भागांत उपस्वागतयात्रा निघणार आहेत, तर काही ठिकाणी गुढी उभारण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाण्यातील श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास संस्थेच्या वतीने दरवर्षी शहरात नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने स्वागतयात्रेचे आयोजन केले असून ही यात्रा शहराच्या मध्यवर्ती भागातील मार्गावरून काढण्यात येणार आहे. या यात्रेत ४५हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असून त्याच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिला जाणार आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता कौपीनेश्वर मंदिर येथून स्वागतयात्रा सुरू होणार आहे. जांभळी नाका, दगडी शाळा, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड आणि तलावपाळी असा यात्रेचा मार्ग असणार आहे. यंदाच्या स्वागतयात्रेत भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळातर्फे सात राज्यांची पारंपरिक नृत्ये साजरी केली जाणार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २९ एप्रिलाला मतदान होणार असून या पाश्र्वभूमीवर मतदानाबाबत जनजागृतीसाठी ३००हून अधिक महिला दुचाकी रॅली काढणार आहे.

तसेच ठाण्यातील म्यूज संस्थेतर्फे मासिक पाळीविषयीही जनजागृती करण्यात येणार आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे शून्यकचरा संकलनाबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तर सरस्वती क्रीडा ट्रस्टच्या माध्यमातून तरुणी नऊवारी साडी परिधान करून मल्लखांब क्रीडा प्रकाराचे प्रात्यक्षिक करणार आहेत. महिलांनी स्व-संरक्षण कसे करावे याची प्रात्यक्षिके हिंदू जनसेवा समितीतर्फे दाखविण्यात येणार आहे.

पर्यावरण बचावासाठी कसा पुढाकार घेता येईल याबाबतही या स्वागतयात्रेत चित्ररथाच्या माध्यमातून संदेश देण्यात येणार आहे. शहरातील मराठा, तेली, कोळी, पंजाबी, बोहरा समाजातील काही समाजबांधव आपल्या पारंपरिक पोषाखात या स्वागतयात्रेत सहभागी होणार आहे. या माध्यमातून विविध सांस्कृतीचे दर्शन ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. यंदा गदिमा, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील सर्व पात्रे संस्थेच्या रथावर पाहायला मिळणार आहेत.

ब्रम्हांडमध्येही उपयात्रा

घोडबंदरमधील नागरिकांसाठी ब्रम्हांडमध्येही उपयात्रा काढण्यात येणार आहे. आझादनगर येथील साईबाबा मंदिर येथून सकाळी ७.३० वाजता ही यात्रा सुरू होऊन ब्रम्हांडच्या मुख्य मार्गावरून ही यात्रा जाईल. या यात्रेत सहभागी होणारे नागरिक पारंपरिक पोषाख परिधान करणार आहेत. ही उपयात्रा ब्रम्हांड येथील टीएमटीच्या डेपोजवळ समाप्त होईल, अशी माहिती ब्रम्हांड स्वागतयात्रेचे शंकर कुंभार यांनी दिली.

स्वागतयात्रेचा प्रवास

स्वागतयात्रेत ४५ हून अधिक देखावे आणि चित्ररथ पाहायला मिळतील. सकाळी ७ वाजता स्वागतयात्रा श्री कौपिनेश्वर मंदिर येथून निघणार आहे.

त्यानंतर ही पालखी जांभळी नाका मार्गे चिंतामणी ज्वेलर्स येथून सेंट जॉन हायस्कूलसमोरून जाईल. मतदान करा, पर्यावरण वाचवा, नेत्रदान करा असे विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ दगडी शाळा चौक येथून पालखीमध्ये सहभागी होतील. चित्ररथांसोबत ही स्वागतयात्रा दगडी शाळा, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरी निवास सर्कलकडून नौपाडा पोलीस ठाण्याजवळून जाईल. त्यानंतर राम मारुती रोड, पु. ना. गाडगीळ चौक येथून उजवीकडे वळून तलावपाळी येथे थांबेल.  चित्ररथ तलावपाळीजवळच थांबविण्यात येतील. त्यानंतर पालखी साईकृपा हॉटेल येथून नौका विहारमार्गे मूस चौकातून कौपिनेश्वर मंदिर येथे जाईल.