डोंबिवलीकर तरुणांकडून ‘थिंक अबाउट इट’ लघुपटाची निर्मिती
वाढते शुल्क ही उच्च शिक्षण घेण्यात मोठी अडचण ठरू लागली असून डोंबिवलीतील तरुणांनी एका लघुपटाद्वारे अतिशय परिणामकारक पद्धतीने ती मांडून त्यावर उपाय सुचविला आहे. व्योम प्रोडक्शन निर्मित ‘थिंकअबाउट इट’ या नावाचा लघुपट त्यांनी तयार केला आहे. सामाजिक कारणांसाठी बनविलेला हा लघुपट तयार करण्यासाठी लागणारा निधी या युवकांनी नातेवाईक, मित्रमंडळींकडून वर्गणी काढून गोळा केला आहे.
प्रणव दीक्षित आणि प्रथमेश भागवत या युवकांनी स्वानुभवातून हा लघुपट तयार केला आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना प्रवेश मिळविण्यासाठी भरभक्कम पैसे मोजावे लागत आहेत. त्यात शैक्षणिक वर्षांतील खर्च वेगळेच. तसेच शिकवण्यांनाही पालकांना वेगळी रक्कम खर्ची घालावी लागते. यातून बाहेर पडल्यावर विद्यार्थी जेव्हा बारावीला असतात, तेव्हाच त्यांचे पालक त्यांच्या पुढील शिक्षणाच्या खर्चाची तजवीज करावी लागते. साधारणपणे बारावीनंतर उच्च शिक्षणाची पायरी सुरू होते. तिथून पुढे उच्च शिक्षणासाठी खर्च लागतो. सर्वानाच तो परवडत नाही. अशा परिस्थितीत शक्य असणाऱ्या पालकांनी आपल्या पाल्याबरोबरच अन्य गरजू विद्यार्थ्यांनाही यथाशक्ती मदत करावी, असा संदेश या लघुपटाद्वारे देण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी या लघुपटामध्ये मुख्य भूमिका बजावली असून गणेश अडवळ यांनी चहावाला आणि सोहम अडवळ यांनी चहावाल्याच्या मुलाची भूमिका साकारली आहे. रेड अ‍ॅपिक कॅमेराद्वारे या लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. गुणवंत असूनही केवळ आर्थिक कारणांमुळे कुणीही उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, असा संदेश या लघुपटाद्वारे देण्यात आल्याची माहिती प्रणव दीक्षित याने दिली.
डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळा, रामनगर पोलीस ठाणे, पिंगळे चौक या ठिकाणी लघुपटाचे चित्रीकरण झाले आहे. कॅमेरामन शेखर नगरकर यांनी चित्रीकरण केले आहे.