ठाणे रेल्वे स्थानकात झालेल्या गर्दीमुळे करोना पसरण्याची भीती

ठाणे : शहरात रेल्वेने दाखल होणाऱ्या परप्रांतीयांची महापालिकेतर्फे शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यात येत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात सोमवारी शेकडोंच्या संख्येने परप्रांतीय दाखल झाले. मात्र महापालिकेतर्फे पुरेशा प्रमाणात नियोजन नसल्यामुळे शीघ्र प्रतिजन चाचणीसाठी लावण्यात येणाऱ्या रांगेमध्ये अंतरनियमांचा फज्जा उडाला. सुमारे दोन ते तीन तास परप्रांतीय नागरिक रेल्वे स्थानकातील या गर्दीमध्ये उभे होते. या गर्दीमुळे शहरात करोना पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाणे शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात रेल्वे स्थानक आणि बस स्थानकात दाखल होणाऱ्या परप्रांतीयांची ठाणे महापालिकेतर्फे शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यात येत आहे. सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे स्थानकात दाखल होणाऱ्या परप्रांतीयांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. या वेळी सकाळी ११च्या सुमारास एकाच वेळी शेकडोच्या संख्येने परप्रांतीय नागरिक रेल्वे स्थानकात दाखल झाले. मात्र, ठाणे महापाकेकडून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात चाचणीसाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या रांगा लावण्याचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे आणि त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या सॅटिस परिसरात सकाळी ११ वाजेपासून मोठी गर्दी उसळली. त्यातच या चाचण्यांचे अहवाल येण्यास अर्धा तास लागत असल्यामुळे परप्रांतीय त्यांच्या कुटुंबीयांसह सॅटिसवर थांबून राहिले होते. त्यामुळे या गर्दीमध्ये अधिकची भर पडली. स्थानक परिसरात गर्दी वाढल्यामुळे चाचणीसाठी लावण्यात आलेल्या रांगेमध्ये अंतरनियमांचा फज्जा उडाला. दोन ते तीन तास रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीयांची ही गर्दी कायम होती. या स्थानकातील या गर्दीमुळे शहरात करोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चाचणीसाठी दोनच कर्मचारी

गेल्या काही दिवसांपासून टाळेबंदी शिथिल झाल्यामुळे रेल्वेमार्गाने शहरात येणाऱ्या परप्रांतीयांची संख्या वाढली आहे. मात्र, रेल्वे स्थानक परिसरात दाखल होणाऱ्या या परप्रांतीयांची शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यासाठी केवळ दोनच कर्मचारी असल्यामुळे चाचण्यांसाठी वेळ लागत असून सॅटिस परिसरात मोठी गर्दी होत आहे. यामुळे लहान मुले आणि महिलांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यातच या ठिकाणी चाचणी करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत.