नाताळानिमित्ताने वसईत उभारण्यात आलेले नाताळ गोठे वसईकरांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. हे नाताळ गोठे म्हणजे कल्पकतेला आधुनिकतेची जोड देऊन विविध सामाजिक संदेश देत आहेत. हे नाताळ गोठे बघण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विविध भागांतील नागरिकांची गर्दी होत आहे.

नाताळच्या सणात ख्रिस्तजन्माचा साकार केलेला देखावा म्हणजेच नाताळ गोठा हे कलात्मकता आणि कल्पकतेचा संगम मानले जाते.वसईत अनेक आकर्षक नाताळ गोठे बनवले आहेत. एवढेच नव्हे तर या नाताळगोठय़ातून विविध सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. वसईमध्ये या सार्वजनिक नाताळ गोठे ही एक वेगळीच संस्कृती आहे. नाताळ गोठा म्हणजे येशू जन्माचा देखावा. येशू ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गोठय़ात झाला होता. त्या गोठय़ाची व त्या काळातील ऐतिहासिक संदर्भाची प्रतिकृती या नाताळ गोठय़ातून दिसून येते. वसईत साधारणत: नाताळ च्या एक महिना आधीपासूनच तरुण मंडळी या नाताळ गोठय़ाच्या तयारीला लागतात. यंदा वसईत विविध ग्रुपतर्फे आप आपल्या गावात सार्वजनिक देखावे आणि सामाजिक संदेश देणारे देखावे तसेच घरगुती देखावे तयार करण्यात आले आहेत.

कुठल्या देखाव्यात काय?

ल्ल पापडी येथील पाचबाव वाडी येथे येशूचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाचा देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यातून घटस्फोट, समलिंगी, वाढते व्यसनाधीन, स्त्री-अत्याचार, कौटुंबिक वाद, वाढती काँक्रीटची जंगले या समस्या मांडण्यात आल्या आहेत. मदर तेरेसा यांच्या सोबत असलेल्या एक सिस्टर आजारी होत्या त्या वेळी संत मदर तेरेसा त्यांच्या कामाबद्दल पदक देण्यासाठी वसईत त्यांच्या घरी १९८६ साली आल्या होत्या. त्या वेळचा देखावा धामामी वाडी येथील तरुणांनी साकारला आहे. किरवली येथील तरुणांनी येशूचा इतिहास मांडला असून तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. वसईतील काळभाट वाडी परिसरात बावखले वाचावा, पाणी वाचावा, पाणी जिरवा असा संदेश देखाव्यातून दिला आहे. चोबऱ्यातील सेव्हन स्टार या १२ वर्षांखालील मुलांच्या ग्रुपने वसईतील जुन्या संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. सांडोरच्या लोढा कॉम्प्लेक्स येथे वेलंकनी कम्युनिटी फाऊंडेशनतर्फे मदर  तेरेसा यांचे जीवन कार्य दर्शविणारा देखावा साकारण्यात आला आहे.