News Flash

सोशल मीडियामुळे विवाह संस्था धोक्यात?

रात्री-अपरात्री ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘फेसबुक’वरून होणारे चॅटिंग, मोबाइलवरून बोलणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळणारे प्रेमसंबंध अशा अनेक

| February 17, 2015 12:08 pm

रात्री-अपरात्री ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘फेसबुक’वरून होणारे चॅटिंग, मोबाइलवरून बोलणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळणारे प्रेमसंबंध अशा अनेक कारणांमुळे पती-पत्नींच्या नात्यात दुरावा निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती एका आकडेवारीतून समोर येत आहेत. ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यात घटस्फोटाची सुमारे सहाशे प्रकरणे समोर आली असून, त्यापैकी निम्म्या प्रकरणांत घटस्फोटासाठी ‘सोशल मीडिया’चे कारण पुढे करण्यात आले आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप या ‘समाजमाध्यमां’मुळे जगातील संवाद वाढला असला, तरी या माध्यमांच्या अतिवापरामुळे कुटुंबव्यवस्थेतील विसंवाद मात्र वाढत चालला असल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे पती-पत्नीतील नात्यांत दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासमोर आल्या आहेत. घटस्फोट घ्यावा या मतापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळवण्याचे काम या प्राधिकरणामार्फत केले जाते. गेल्या वर्षभरात या प्राधिकरणाकडे सुमारे सहाशे घटस्फोटांची प्रकरणे आली. त्यापैकी ५५ ते ६० दाम्पत्यांचे यशस्वी समुपदेशन झाल्याने ते सुखाने नांदू लागले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य आणि समुपदेशक अ‍ॅड. त्रिंबक कोचेवाड यांनी दिली.
लग्नात मानपान किंवा हुंडा दिला नाही, स्वयंपाक येत नाही, सासु-सासरे छळ करतात, अशा स्वरूपाची कारणे यापूर्वी पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत होती. मात्र, आता यात ‘सोशल मीडिया’शी संबंधित कारणेही वाढू लागली आहेत. गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या सहाशे तक्रारींपैकी जवळपास निम्म्या तक्रारी या स्वरूपाच्या आहेत, अशी माहिती कोचेवाड यांनी दिली.  

अतिवापरामुळे विसंवाद
‘सोशल मीडिया’ हे संवादाचे यशस्वी माध्यम आहे. मात्र, याच्या अतिवापरामुळे कुटुंबात विसंवाद वाढत चालला आहे. दिवसभर नोकरीधंदा सांभाळून घरी परतल्यानंतरही ‘सोशल मीडिया’वर वेळ घालवण्यात अनेक जण धन्यता मानतात. यामुळे पती-पत्नींमध्ये पुरेसा संवाद होत नाही. यातूनच कुटुंबात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पुढे काही तत्कालिक कारणातून या नकारात्मक ऊर्जेचा स्फोट होतो आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते, असे कोचेवाड म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 12:08 pm

Web Title: social media create threat to marriage organization
टॅग : Social Media
Next Stories
1 कल्याणमध्ये चार जणांना ‘स्वाइन फ्लू’ची लागण
2 तोडकाम सुरूच
3 मुजोर बिल्डरांना पालिकेचा हिसका
Just Now!
X