राज्य निवडणूक आयुक्तांची कबुली

सध्या निवडणूक प्रचार मोहिमेत अत्यंत परिणामकारक ठरत असलेल्या सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाकडे अद्याप कोणतीही ठोस यंत्रणा नाही, अशी कबुली राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी ठाण्यात दिली. मात्र लवकरच तांत्रिकता तपासून या माध्यमातील प्रचारालाही आचारसंहितेची वेसण घातली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीतील विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले कोटय़वधींचे पॅकेज हा आचारसंहितेचा भंग नाही का याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर यासंदर्भात विरोधी पक्षांकडून तक्रारी आल्या आहेत. स्थानिक निवडणूक निरीक्षकही याबाबत त्यांचा अहवाल देतील. ते सर्व तपासल्यानंतरच याबाबतीत निवडणूक विभाग आपला अभिप्राय देईल, असे उत्तर त्यांनी दिले.

पाच लाख नावे वगळली 

लोकसभा निवडणुकांपासून ठाणे जिल्ह्य़ातील मतदार याद्यांबाबत बऱ्याच तक्रारी होत्या. मतदार याद्यांमध्ये छायाचित्रांचे प्रमाणही बरेच कमी होते. त्यामुळे बोगस मतदान होत असल्याचा आरोप अनेक ठिकाणी केला गेला होता. आता मतदार यादीतील छायाचित्रांचे प्रमाण ८१ टक्के इतके आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तपासणीअंती मतदार याद्यांमधून दुबार आणि मृत स्थलांतरित अशी एकूण ५ लाख २७ हजार ८३३ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा क्षेत्रातील मतदारांची संख्या ५५ लाख ४८ हजार ९०९ इतकी आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मतदार मोहीम राबविण्यात येणार आहे.