महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांना सामाजिक भान यावे, या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहे. साधारण दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसऱ्या सत्रात प्रत्येक महाविद्यालयातील ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांची शिबिरे परिसरातील ग्रामीण भागामध्ये आयोजित केली जातात. साधारण आठवडाभराच्या या शिबिरात त्या त्या परिसरातील लोकजीवनाचा अभ्यास करणे, आरोग्य सुविधा पुरविणे, स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे तसेच श्रमदानाने एखादा बंधारा अथवा रस्त्याचे काम मार्गी लावणे आदी उपक्रम एनएसएसच्या शिबिरात राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजना हा महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. त्याला विशिष्ट गुण असतात. त्यामुळे विद्यार्थी त्यात हिरिरीने सहभागी होतात. पुन्हा घरापासून दूर समवयस्क मित्र-मैत्रिणींसोबत दूरवरच्या एखाद्या गावात जाऊन काही दिवस राहण्यात आगळी मौज असते. मात्र महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर यथावकाश बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनावरील समाजसेवेचा हा प्रभाव कमी होतो. नोकरी-व्यवसायामुळे अनेकांना इच्छा असूनही समाजसेवेसाठी वेळ राखून ठेवता येत नाही. ठाण्यातील काही संवेदनशील तरुण मात्र त्याला अपवाद ठरले. शिबिरादरम्यान मनात रुजलेली सामाजिक जाणीव त्यांच्या मनात कायम राहिली. त्यातूनच आठ वर्षांपूर्वी २००७ मध्ये शौर्य फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची ठाण्यात स्थापना झाली. तेव्हा ठाणे आणि आता पालघर जिल्हय़ात मोडणाऱ्या वाडा-विक्रमगडमधील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने पुरविणे, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधणे, रुग्णांची विचारपूस करणे, दहीहंडीच्या काळात प्रथमोचार सेवा उपलब्ध करून देणे, लहरी निसर्गामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आदी उपक्रम शौर्य फाऊंडेशनच्या वतीने राबविले जातात. सुरुवातीच्या काळात सभासद आपापसात वर्गणी काढून ‘शौर्य’च्या उपक्रमांसाठी निधी जमवत असत. पुढे मात्र कार्याची व्याप्ती वाढत गेल्याने आणखी पैशाची गरज वाटू लागली. त्यामुळे नंतर परिचितांकडून देणगी स्वीकारली जाऊ लागली. रोहित जाधव, चेतन भोसले, प्रमोद पाटील आदी सभासद नोकरी-व्यवसाय सांभाळून ‘शौर्य’चे कामकाज पाहतात. नीतल वढावकर, अर्चना भोर आदी विश्वस्त म्हणून ‘शौर्य’चे काम पाहतात. २५ ते ३८ वयोगटातील सळसळत्या उत्साहाची तरुणाई हे ‘शौर्य’चे बलस्थान आहे. त्याच बळावर आजूबाजूचे जग सुंदर करण्याची उमेद बाळगून शौर्य फाऊंडेशन विविध उपक्रम राबवीत आहे. तरुणांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत पाहून ठाणे शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच दानशूर व्यक्ती स्वयंस्फूर्तीने आता ‘शौर्य’ला मदत करू लागले आहेत. ‘शौर्य’चे कार्यकर्ते दरवर्षी पनवेल तालुक्यातील शांतिवन आश्रमात तेथील कुष्ठरोगी रुग्णांसोबत दिवाळी साजरी करतात.
शेतकऱ्यांना मदतीचा हात
अनेकदा अशा प्रकारचे उपक्रम आरंभशूर असतात. काही दिवस उत्साहाच्या भरात उपक्रम राबविले जातात. मात्र नंतर सामाजिक कार्याची ऊर्मी भूतकाळात जमा होते. ‘शौर्य फाऊंडेशन’च्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. सध्या सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे देशोधडीला लागलेल्या विदर्भ- मराठवाडा भागांतील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची ‘नाम फाऊंडेशन’ ही संस्था कार्यरत आहे. अशाच प्रकारचे कार्य ‘शौर्य’नेही गेल्या वर्षी केले.
यंदा जसे दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले, तसे गेल्या वर्षी गारपिटीने त्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. शेतातील उभे पीक गारांच्या माऱ्याने आडवे झाल्याने त्यावर सर्वस्व अवलंबून असलेली हजारो शेतकरी कुटुंबे हतबल झाली होती. वृत्तपत्रातून त्याविषयी प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वाचून ‘शौर्य’ने किमान काही शेतकऱ्यांना का होईना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लातूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली. दीड लाख रुपयांचे वाटप ‘शौर्य’’ने केले. प्रत्येक शेतकऱ्यास पाच हजार रुपये देण्यात आले. त्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबरोबरच बी-बियाणे तसेच खतांचीही आवश्यकता असल्याचे ‘शौर्य’च्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे काही महिन्यांनंतर पुन्हा वर्गणी काढून शेतकऱ्यांना खत तसेच बी-बियाणे दिले. ‘जय जवान, जय किसान’ हा भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा नारा होता. शेतकरी जगला तरच देश वाचेल,
त्यामुळे ‘आहे रे’ वर्गातील
प्रत्येकाने दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करायला हवी, असे ‘शौर्य’च्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

शैक्षणिक मदत
दुर्गम भागातील दारिद्रय़ाचे दुष्टचक्र भेदायचे असेल, तर तेथील नव्या पिढीला चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यायला हवे, या हेतूने शौर्य फाऊंडेशन अगदी सुरुवातीपासून वाडा तालुक्यातील परळी आणि विक्रमगड तालुक्यांतील मान येथील आदिवासी आश्रमशाळांमध्ये काम करीत आहे. या दोन्ही ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये प्रत्येकी पाचशे-साडेपाचशे मुले आहेत. तेथील मुलांना संस्थेतर्फे चांगल्या दर्जाची शैक्षणिक साधने पुरवली जातात. शिवाय क्रिक्रेट, बॅडमिंटन, दोरीच्या उडय़ा, बास्केटबॉल आदी खेळांचे साहित्यही संस्था पुरवते. आता संस्थेचे कार्य अनेकांना माहिती झाल्याने शहरातील अन्य लोकही आश्रमशाळेतील मुलांना यथाशक्ती मदत करू लागले आहेत. ‘सिप्ला’ कंपनी त्यांच्या ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत ‘शौर्य’च्या उपक्रमात सहभागी होऊ लागली आहे. या दोन्ही आश्रमशाळांमध्ये ‘शौर्य’चे कार्यकर्ते वर्षांतून किमान तीनदा जातात. औषधोपचार आणि अन्नधान्य पुरवठाही केला जातो.