विवाहखर्चाची रक्कम १७ संस्थांना दान; मराठे परिवाराकडून स्तुत्य कार्य

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शहरी भागातही पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, दुर्गम आदिवासी पाडय़ांमध्ये असलेली कुपोषणाची परिस्थिती या सगळ्या घटनाक्रमाचा विचार करून ठाण्यातील मध्यमवर्गीय मराठे परिवाराने आपल्या एकुलत्या एक अभिनेत्री, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या लाडक्या कन्येचा विवाह अत्यंत साधेपणाने साजरा करत भपकेबाज लग्न सोहळ्यांवर लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या अनेकांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे.

Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
thane police issued tadipaar notice to sharad pawar faction ncp ex corporator mahesh
ठाणे: शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकावर तडीपारीची टांगती तलवार
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

साधेपणाने विवाह साजरा करण्याच्या स्वरांगी आणि तिच्या कुटुंबीयांचा प्रस्ताव वर पक्षानेही उचलून धरला. आप्त स्वकीयांना फक्त ‘मुलीचे लग्न करतोय, लग्नाचे आमंत्रण देत नाही, रागावू नका, नवदाम्पत्याला आपले आशीर्वाद आहेतच,’ असे आमंत्रण ई मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. शंभर ते सव्वाशे वऱ्हाडींच्या उपस्थितीत साधेपणात वैदिक पद्धतीने मुलीचा विवाह सोहळा ठाण्यात पार पडला. वाचविलेली ही रक्कम तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक, स्वंयसेवी १७ संस्थांच्या प्रतिनिधींना विवाह सोहळ्याच्या दिवशी सुपूर्द केली.

मराठे ठाण्यातील मध्यमवर्गीय कुटुंब. ज्येष्ठ घरंदाज गायक, संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे चिरंजीव प्रसिद्ध गायक व रंगकर्मी मुकुंद मराठे हे एक बँकर. मुकुंद व केतकी मराठे यांची स्वरांगी ही एकुलती एक लाडकी कन्या. मुलगी अभिनेत्री व शास्त्रीय संगीताची गायिका. स्वरांगीचा विवाह ठाण्यातील शिरीष व वर्षां काळे यांचा पुत्र निखिल याच्यासोबत ठरला. घरात पहिलेच आणि शेवटचे लग्न होत असल्याने ते थाटामाटात करू या असा विचार सुरुवातीला मुकुंदरावांच्या मनी आला. मराठे घराण्याचा लोकसंग्रह पाहून विवाहाला सुमारे दोन ते तीन हजार वऱ्हाडी येतील हे गणित करून लग्नपत्रिका, विवाहासाठी सभागृह, भोजन, विवाहासाठी मुलगा, मुलीला लागणारे मानपानाचे, लग्नातील धार्मिक विधीवर बसण्यासाठी लागणारे कपडे (बस्ता), दागिने, मुलीची सौंदर्यभूषा, विवाहाची पैठणी, मुलाचे विवाहाचे कपडे असा सगळा हिशेब करता करता खर्चाचे आकडे फुगत गेले. हे आकडे ऐकून मुकुंदराव आश्चर्यचकित झाले. राज्यभर दुष्काळसदृश परिस्थिती असताना मुलीच्या लग्नावर एवढा खर्च करायचा आणि पैसा आणि पाणी दोन्ही खर्च करायचे या विचाराने मराठे कुटुंबीय अस्वस्थ झाले. याविषयीे त्यांनी आपल्या खास आप्तांचा सल्ला घेतला. साधेपणाने लग्न करण्याचा विचार मग वर पक्षातील काळे कुटुंबीयांना कळविण्यात आला. त्यांनीही काही हरकत नसल्याचे कळविले.  स्वरांगी येऊरच्या बालकाश्रम, वनवासी कल्याण आश्रमात संस्कार वर्ग शिकविण्यासाठी जायची. त्यामुळे तिच्यावर बालवयातच काटकसर, काटेकोरपणाचे संस्कार झाले आहेत. तिनेही क्षणात अनावश्यक खर्चाला कात्री लावून साधेपणाच्या विवाहाला मान्यता दिली, असे मुकुंदराव यांनी सांगितले. हा वाचवलेला खर्च विविध १७ संस्थांना देण्यात आला.

या सामाजिक संस्थांना दान

  • मणीपूर पूर्वाचल विकास संस्था, नांदिवली, डोंबिवली पूर्व
  • वनवासी आश्रमाचा उद्योगवर्धिनी विभाग, सोलापूर
  • लातूर येथील संवेदना संस्था
  • संगीताच्या प्रसारासाठी कार्यरत डोंबिवलीतील शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान
  • गिरीश प्रभुणे यांची भटके विमुक्त सेवा प्रकल्प, यमगरवाडी व इतर १२ संस्था

विवाह म्हणजे हल्ली ‘इव्हेन्ट’ झाला आहे. तीन ते चार तासासाठी लाखो, कोटय़वधी रुपये उधळले जातात. दुसरीकडे समाजातील एक वर्ग मात्र अन्न, कपडय़ांसाठी दारोदार फिरतोय. असा अनावश्यक पैसा गरजू, गरीबांसाठी खर्च केला, तर एका मोठय़ा वर्गाला आर्थिक आधार मिळेल. हा विचार करून साधेपणात मुलीचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. अनेकांच्या मनात असे कार्यक्रम करण्याची इच्छा असते, पण निर्णय होत नाही. परंतु, आता समाजातील प्रत्येक घटकाने असे धाडसी पाऊल उचलणे आवश्यक आहे.

-मुकुंद मराठे, रंगकर्मी व बँकर