‘उत्तम आरोग्य’ हा शरीराचा सगळ्यात मौल्यवान दागिना आहे, असे म्हटले तर कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही. निरोगी आरोग्य लाभले नाही तर शरीराच्या काही ना काही  तक्रारी नेहमीच सुरू राहतात. कोणत्याही गोष्टीचा मनापासून आनंद घेता येत नाही. यावर उपाय म्हणजे आपले आरोग्य चांगले राहील याची प्रत्येकाने काळजी घेणे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आता काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर रोगाची सुरुवात, तो कोणत्या अवस्थेत आहे, त्यावरील प्राथमिक उपचार आदी गोष्टी तातडीने सुरू करता येतात व होणारा किंवा झालेला आजार वेळीच लक्षात आल्याने औषधोपचार सुरू करता येतात आणि पुढील दुष्परिणाम टाळता येतात. या सगळ्यात महत्त्वाची भूमिका ‘पॅथॉलॉजी लॅब’ची असते. येथे रक्त, लघवी, थुंकी आणि अन्य गोष्टींच्या तपासण्यांमधून नेमका आजार कळण्यास मोलाची मदत होते.

आजच्या ‘सेकंड इनिंग’चे मानकरी आहेत बदलापूरचे ‘आरोग्य मित्र’ श्रीराम मोहरीर. बदलापूर येथील काका गोळे फाऊंडेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या ‘पॅथॉलॉजी लॅब’मध्ये ते ‘मानद सेवा’ देत आहेत. या क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव असून नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ‘सामाजिक सेवा’ म्हणून ते हे काम आनंदाने करत आहेत.

मोहरीर यांचे मूळ नाव श्रीराम असले तरी ते ‘राम’या नावानेच परिचित आहेत. १९७२ मध्ये ते डोंबिवलीतील धनाजी नानाजी चौधरी बहुद्देशीय विद्यालयातून (डीएनसी शाळा) मॅट्रिक झाले. उल्हासनगर येथील ‘आरकेटी’ महाविद्यालयातून १९७६ मध्ये विज्ञान विषयाची पदवी मिळविली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षण न घेता त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. बृहन्मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात ते ‘लॅब टेक्निशियन’ म्हणून नोकरीला लागले. दरम्यान येथून त्यांनी काही काळ ‘व्हेटर्नरी कॉलेज’मध्येही ‘पोल्ट्री विभाग’ येथे लसीकरण कार्यक्रमासाठी काम केले. पण येथे त्यांचे मन फारसे रमले नाही. त्यामुळे ते पुन्हा  १९७९ मध्ये ‘केईएम’मध्ये रुजू झाले. नोकरीच्या कालावधीत त्यांना कामाचा मोठा अनुभव गाठीशी बांधता आला. विविध डॉक्टरांशी संबंध आला, त्यांच्याशी तसेच येणाऱ्या रुग्णांशी संवाद झाला. यातून त्यांनाही काही शिकायला मिळाले. ‘केईएम’मधील दीर्घ सेवेनंतर २००९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरुवातीची दोन वर्षे त्यांनी स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ दिला पण नंतर त्यांना स्वस्थ बसवेना. नोकरीतील या अनुभवाचा थोडाफार फायदा समाजाला करून द्यावा, असा विचार त्यांच्या मनात आला आणि बदलापूर येथील काका गोळे फाऊंडेशनच्या रूपाने त्यांना आपल्या सामाजिक कामाचा मंत्र मिळाला.  फाऊंडेशनचे विश्वस्त आशीष गोळे व बदलापूर येथील डॉ. करमरकर यांच्यामुळे ते या पॅथॉलॉजी लॅबच्या कामाशी जोडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या मोहरीर यांच्यावर लहानपणापासून सामाजिक सेवेचा ‘संस्कार’झाला होताच.

मोहरीर सांगतात ‘काका गोळे फाऊंडेशनच्या कार्यालयात आशीष गोळे यांना भेटायला गेलो. नोकरीत मी जे काम केले त्याच्याशी संबंधितच हे काम असल्याने मला विचारणा झाल्यानंतर मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. तसेच या कामासाठी मला कोणतेही मानधन/वेतन नको, मी हे काम ‘मानद सेवा’ म्हणून करणार असल्याचे गोळे यांना सांगितले होतेच. पण त्यांच्या कार्यालयात लिहिलेल्या ‘इट इज टाइम टू गिव्ह’ या वाक्याने मी प्रभावित झालो. ते वाक्य मला आवडले आणि या लॅबच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. आमच्या या लॅबमध्ये रक्त, लघवी, थुंकी आणि संबंधित सर्व चाचण्या माफक शुल्कात केल्या जातात. ही लॅब ‘ना नफा – ना तोटा’या तत्त्वावर चालविली जाते. बदलापूरमधील मध्यमवर्गीय, आर्थिक परिस्थिती बेताची असलेले लोक तसेच बदलापूरजवळील खेडय़ांमधील अनेक लोक या लॅबचा लाभ घेत आहेत. खेडय़ातील येणाऱ्या लोकांना आरोग्यविषयक सल्ला देणे, या तपासण्यांचे महत्त्व समजावून सांगणे, त्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही मोहरीर करतात. लॅबच्या कामात त्यांना चित्रा वानखेडे व अनिता पाटील यांचे सहकार्य लाभते. मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून रुग्णांच्या या गोष्टींचे नमुने तपासून घेतले जातात.

सध्या आपली सगळ्यांचीच जीवनशैली बदलली आहे. धावपळीचे जीवन, ताण-तणाव, स्पर्धा यामुळे लहान वयातच रक्तदाब, मधुमेह, पाठदुखी, गुडघेदुखी असे आजार मागे लागतात. त्यामुळे तरुणांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ‘फास्टफूड किंवा जंकफूड’ घेणे टाळावे, वयाची चाळिशी उलटली की दर वर्षी वाढदिवसाला आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या जरूर करून घ्याव्यात. ज्येष्ठ नागरिकांनीही आरोग्याच्या बारीकसारीक तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्यात, अशी सूचनाही ते करतात.

या कामात मला मुलगा पुष्कर, विवाहित कन्या डॉ. गौरी व आर्किटेक्ट असलेले जावई सौरभ चौधरी आणि माझी पत्नी शुभदा यांचे संपूर्ण सहकार्य मिळते. आजवरच्या आयुष्यात जे मिळाले त्यात मी समाधानी आणि आनंदी आहे. आता शरीर साथ देईल तोपर्यंत हे काम करण्याचे आपण ठरविले असल्याचे मोहरीर सांगतात.