चाळीतल्या रहिवाशांचा एकोपा कायम राहावा, सुखदु:खांची देवाणघेवाण व्हावी आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने सुरू झालेली सोडा चाळीतील होळी पन्नास वर्षांनंतरही आपले अस्तित्व टिकवून आहे. जुन्या चाळीत साजरा होणारा हा उत्सव यंदा चाळीच्या जागी उभ्या राहिलेल्या नव्या इमारतीच्या प्रांगणामध्ये साजरा केला जाणार आहे. जुन्या चाळीत राहणारे रहिवासी आणि नव्या इमारतीतील रहिवासी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करणार आहेत. सोडा चाळीतल्या होळीचे चाळ ते इमारत असे स्थित्यंतर झाले असले तरी होळी मात्र त्याच उत्साहात साजरी केली जाणार असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
कल्याणच्या शिवाजी चौक परिसरातील गीता सभागृहाजवळच्या घोसाळा रोडवरील सोडा चाळ म्हणजे ३० बिऱ्हाडांचे छोटेसे घरकुल. सरकारी कर्मचारी, गिरणी कामगार, पोलीस, खासगी कर्मचारी अशा सगळ्याच क्षेत्रांतील मंडळी या चाळीचे रहिवाशी आहेत. त्यांनीच १९६० च्या सुमारास चाळीमध्ये होळी उत्सवाला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी ही होळी म्हणजे एक प्रकारचे स्नेह संमेलन होते. चाळीतली मंडळी बाजारातून लाकडे विकत आणून होळी पेटवत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल, कलिंगड आणि भेळ अशा मेजवानीचा बेत होळीच्या निमित्ताने ठरलेला. घराघरांतून येणाऱ्या नैवेद्याने ही लज्जत आणखी वाढायची.
घरगुती पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या या होळीच्या कार्यक्रमातून चाळीने सण व्यवस्थापनाचा एक आगळा आदर्श सर्वापुढे आखून दिला होता. पुढे शैक्षणिक आणि कामानिमित्ताने चाळीत राहणाऱ्या मंडळींनी कल्याणच्या विविध भागांमध्ये स्थलांतर केले. सोडा वसाहतीच्या या इमारतीमधील सगळेच भाडेकरू आणि रहिवाशांनी २०१० मध्ये ही इमारत रिकामी करून नव्या बांधकामासाठी मोकळी करून दिली. इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही तीन वर्षे होळीचा सण हे रहिवासी एकत्रितपणे साजरा करत होते. यंदा या चाळीच्या जागी आता इमारत उभी राहिली असून तेथे काही नवे रहिवासी राहण्यासाठी आले आहेत. मात्र सगळ्यांना एकत्र आणणारा हा होळी सण या भागातील पूर्वीचे रहिवासी याही वर्षी नव्या इमारतीच्या प्रांगणात साजरा करणार आहेत.
शशिकांत ओक, प्रकाश देशपांडे, सदाशिव प्रभू, उल्हास प्रभू, शशिकांत निमकर, बाबा निमकर, विजय सोडा, प्रदीप ठक्कर, रवींद्र ओक हे पूर्वीचे चाळकरी या उत्सवासाठी जातीने हजर राहणार असून यंदाही होळी साजरी केली जाणार आहे.  

होळीमुळेच एकत्र आलो
होळीच्या निमित्ताने एकत्र येत असताना एकत्वाची भावना निर्माण होण्यास मदत झाली, कौटुंबिक जिव्हाळा वाढत गेला आणि संपूर्ण चाळ म्हणजे एक कुटुंब बनले. पुढे प्रत्येकाच्या वाटा वेगळय़ा झाल्या; पण होळीबद्दलची ओढ कायम राहिली. त्यामुळेच होळीचा हा उत्सव जुन्या आणि नव्या रहिवाशांच्या मदतीने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे येथील रहिवासी शशिकांत ओक सांगतात. पूर्वी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाणाऱ्या सणाला आधुनिक रूपडे देण्याचा प्रयत्न केले असून पूर्वी केवळ एक दिवस साजरी होणारी होळी यंदा दोन दिवस साजरी होणार आहे. होळीच्या रात्रीचा जागर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशीचा महाप्रसादाचे आयोजन रहिवाशांसाठी वर्षभर आठवणीत राहील असा सोहळा या निमित्ताने साजरा करण्यात येणार असल्याचे ओक यांनी सांगितले.
श्रीकांत सावंत, कल्याण</strong>

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?