पारंपरिक स्रोताद्वारे अद्याप वीज पोहोचू न शकलेल्या जव्हार तालुक्यातील सात पाडे आता सौर ऊर्जेद्वारे उजळले आहेत. प्रगती प्रतिष्ठान, आयसीआयसीआय बँक आणि ग्रामऊर्जा सोल्युशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी हेदोली पाडा येथे झाला. खासदार अ‍ॅड. चिंतामणी वनगा आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  
या प्रकल्पाचे वैशिष्टय़ म्हणजे केवळ दिवेच नव्हे तर पंखे, फ्रिज, टी.व्ही., घरघंटी आदींबरोबरच सौरपंपही या सौर ऊर्जा केंद्राद्वारे चालणार आहेत. या प्रकल्पाद्वारे केवळ प्रकाश नव्हे तर आदिवासींचा सर्वागीण विकास साधला जाईल, असा विश्वास प्रगती प्रतिष्ठानच्या सचिव सुनंदा पटवर्धन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. विष्णू किरकिरे, लक्ष्मी पारधी, मयुरी राथड या ग्रामस्थांनीही मनोगत व्यक्त केले.  भारतात विजेचे उत्पादन कमी असून मागणी जास्त आहे. त्यातही शहरी भागात विजेचा वापर सर्वाधिक असून ग्रामीण भाग अंधारातच आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळेच ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन गिरीश कुबेर यांनी या वेळी केले.  चिंतामणी वनगा यांनी या दुर्गम भागात केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबविणार असल्याचे आश्वासन या वेळी दिले. आयसीआयसीआय बँकेचे मुख्य व्यवस्थापक जयसिंग धुमाळ, ग्रामऊर्जा सोल्युशन प्रा. लि. कंपनीचे अन्शुमन, प्रसाद कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.