रेल्वेच्या जुन्या वास्तू आणि यार्ड परिसरात भयाण वातावरण; 
भिकारी, गर्दुल्ले, गुंड आणि दारूडय़ांचा सर्वसामान्यांना उपद्रव
मुंबईतील बंद पडलेल्या शक्ती मिल परिसरात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर अशी निर्जन ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही उपाययोजना राबवल्या. मात्र कल्याणमधील सुरक्षा यंत्रणांनी मुंबईतील घटनेपासून धडा घेण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. त्यामुळेच कल्याण पूर्वेकडील रेल्वे प्रशासनाच्या विस्तीर्ण जागेत वाढलेली झुडपे आणि पडक्या घरांच्या परिसरात गर्दुल्ले, गुंड, दारूडे आणि अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांनी आपला अड्डा जमवला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.
भारतीय रेल्वेची भुसावळनंतरची सर्वात मोठी जागा कल्याण जंक्शन परिसरात आहे. या भागात कल्याण पूर्वेकडील बाजूला रेल्वेची सुमारे साडेतीनशे एकर जागा आहे. याच ठिकाणी रेल्वेच्या वास्तू असून त्यातील बहुसंख्य इमारती वापराविना पडून आहेत. वर्षांनुवर्षे या परिसराची देखरेख न केल्यामुळे रेल्वे स्थानक परिसर आणि कल्याण पूर्व भागामध्ये सुमारे १०० हून अधिक ठिकाणे निर्जन बनली आहेत. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेकडील रेल्वेची जागा तसेच स्थानक परिसरातही अशी निर्जन स्थळे असून तेथे अमली पदार्थसेवन करणारे गर्दुल्ले, दारूडे आणि गुंडांचा वावर वाढला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणे सर्वसामान्यांसाठी धोक्याचे बनले आहे. या भागात यापूर्वी अनेक गुन्हेगारी कृत्ये घडली असल्याने त्याचे भीतीदायक वातावरण नागरिकांमध्ये आहे. सामूहिक बलात्कार, नवजात अर्भक सापडणे आणि हत्येच्या अनेक घटना या निर्जन भागातून उघड झाल्या असून रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस यांच्या सीमावादाचा फटका या भागात संरक्षण न मिळण्यास होत आहे. केवळ येथील फेरीवाल्यांना हुसकावण्याचे काम करण्यात येत असून गुन्हेगारी घटनांकडे मात्र त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते.
कल्याण रेल्वे यार्डातील गुन्हेगारी घटना
’ १० मे २०१५ – बांगलादेशी तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून कल्याण रेल्वे यार्डाच्या परिसरात नेऊन सामूहिक बलात्कार.
’ एप्रिल २०१३ – कल्याण एफ केबिन परिसरात मृत अर्भक सापडले.
’ जुलै २०१३ – कल्याण पश्चिमेकडील स्थानक परिसरामध्ये नवजात अर्भक सापडले.
’ जुलै २०१० – श्रेयस नाडगे या दोन वर्षांच्या बालकाची हत्या करून मृतदेह रेल्वे यार्डात फेकला.
’ कल्याण रेल्वे यार्डामध्ये घडलेल्या गुन्ह्य़ांबरोबरच चोरी, लूट आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत.

कल्याण पूर्वेतील रेल्वे यार्डाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याची असून त्यांच्याकडून या भागात सुरक्षा पुरवणे अपेक्षित आहे.
– अनंत राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात असला तरी त्याची पुरेशी दखल घेतली जात नाही. या भागात मुंबईतील शक्ती मिलसारखी परिस्थिती असून गुन्हेगारी कृत्यांसाठी ही ठिकाणे निमंत्रणच देत आहेत.
– नितीन निकम, माजी नगरसेवक