वाहतुकीचा ओघ लक्षात घेऊन विरुद्ध बाजूचा एक मार्ग वाहनांना मोकळा
ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. अरुंद कोपरी उड्डाणपुलामुळे या मार्गावरून सकाळच्या वेळेत मुंबईकडे, तर सायंकाळच्या वेळेत ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. मुलुंड टोलनाका तसेच आनंदनगर चेकनाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. हे लक्षात घेऊन या कोंडीवर तात्पुरता उतारा शोधण्यासाठी सकाळच्या वेळेत नाशिक बाजूकडे जाणाऱ्या दोनपैकी एक मार्गिका मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सायंकाळी मुंबईकडे जाणारी एक मार्गिका नाशिक बाजूकडे जाण्यासाठी खुली केली जाणार आहे. येत्या शुक्रवारपासून हे बदल प्रयोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत. १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे बदल लागू केले जाणार आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. हा महामार्ग दोन्ही बाजूंना चारपदरी असला, तरी ठाण्यातील कोपरी उड्डाण पुलाजवळ मात्र तो दुपदरी होतो. या मार्गावरून सकाळी मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्यांचा आकडा मोठा असतो. त्यामुळे या मार्गावर सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसू लागले आहे. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी या मार्गामध्ये प्रायोगिक तत्त्वावर मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे बदल लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त पुलकेशीन मठाधिकारी यांनी दिली.

असे असतील बदल..
कोपरी रेल्वे उड्डाणपुलावरसकाळच्या वेळेत नाशिक बाजूकडे जाणाऱ्या दोनपैकी एक मार्गिका मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तर सायंकाळी मुंबईकडे जाणारी एक मार्गिका नाशिक बाजूकडे जाण्यासाठी खुली केली जाणार आहे.
पादचारी पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल
ठाण्यातील विवियाना मॉलसमोर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल उभारण्यात येणार असून या कामासाठी ९ एप्रिलला रात्री ११ ते १० एप्रिलला सकाळी १० या वेळेत कॅडबरी उड्डाणपूल ते माजिवाडा उड्डाणपुलाची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत या मार्गे मुंबईहून नाशिक तसेच घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी कॅडबरी उड्डाणपुलाऐवजी नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन येथून सव्‍‌र्हिस रोड मार्गे विवियाना मॉल, ज्युपिटर हॉस्पिटल मार्गे गोल्डन डाईज नाका येथून घोडबंदर किंवा नाशिकच्या दिशेने जावे. तर घोडबंदर -नाशिकहून येणाऱ्या वाहनांनी गोल्डन डाईज जंक्शन येथून सव्‍‌र्हिस रोड मार्गे कॅडबरी जंक्शन, नितीन जंक्शन मार्गे मुंबईला जावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.