सोनवणे महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कचराभूमीजवळ सोनवणे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात सध्या बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या सकाळच्या वेळेत आधारवाडी कचराभूमीवर जेसीबीच्या साहाय्याने कचरा सपाटीकरणाचे काम पालिकेतर्फे सुरू असते. या कचऱ्याच्या दरुगधीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मळमळणे, उलटय़ा होणे असे प्रकार होत आहेत. विद्यार्थी, पालक, महाविद्यालयाने हे सपाटीकरणाचे काम परीक्षेच्या वेळेत करू नये, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केल्याने परीक्षा सुरू असेपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत कचरा ठेकेदाराने कचरा सपाटीकरणाचे काम करू नये, असे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वी सोनवणे महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना कचऱ्याच्या दरुगधीमुळे उलटय़ा, डोकेदुखीचा त्रास झाला. त्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महाविद्यालय व्यवस्थापनाने पालिकेकडे किमान परीक्षेच्या काळात आधारवाडी कचराभूमीवरील सपाटीकरणाचे काम थांबवावे, अशी मागणी केली होती. अनेक पालक विद्यार्थ्यांसोबत परीक्षेच्या ठिकाणी येतात. ते महाविद्यालयाच्या परिसरात झाडाखाली बसलेले असतात. त्यांनाही येथील दरुगधीचा सामना करावा लागत आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांनी महाविद्यालय व्यवस्थापन, पालकांना परीक्षेच्या काळापर्यंत कचरा सपाटीकरणाचे काम थांबविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तरीही हे काम सुरूच राहिले. पालिका विद्यार्थ्यांच्या हिताची जराही दखल घेत नसल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आश्वासन देऊनही हे काम सुरूच राहिल्याने या सगळ्या निष्क्रियतेला उपायुक्त सुरेश पवार जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांकडून प्रशासनाला देण्यात आले. सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बारावीची परीक्षा चालू असेपर्यंत आधारवाडी क्षेपणभूमीवर सपाटीकरणाचे काम करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.ह्ण