अतिदक्षता विभागाबाबत ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते.

लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : शहरात एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असताना कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने गौरी सभागृहात कोविड केंद्रातील गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेला अतिदक्षता विभाग अचानकपणे बंद केला होता. त्यामुळे गंभीर रुग्णांची फरफट होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. याबाबत नागरिकांत संताप वाढत असतानाच पालिकेने अतिदक्षता विभाग चालवण्यासाठी पुन्हा निविदा जाहीर केली आहे. त्यामुळे गौरी सभागृहातील रुग्णालयात लवकरच अतिदक्षता विभाग नव्याने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. करोनाच्या संकटात उशिराने का होईना, पण बदलापूर शहरात कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून दोन ठिकाणी रुग्णालये सुरू करण्यात आली होती. सोनिवली येथील बीएसयूपी गृहप्रकल्पात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी रुग्णालय आणि विलगीकरणासाठी कक्ष सुरू करण्यात आला होता, तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पश्चिमेतील गौरी सभागृहात पालिकेने सुमारे २५० खाटांची व्यवस्था असलेले कोविड रुग्णालय सुरू केले. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ३० खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आला होता. राज्यातील नगरपालिकेने सुरू केलेला हा पहिला अतिदक्षता विभाग ठरला होता. चार महिने यशस्वीपणे चाललेल्या या विभागात २३७ गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे एकही गंभीर रुग्णाचा या रुग्णालयात मृत्यू झाला नाही. असे असतानाही रुग्णसंख्या कमी होत असल्याचे कारण सांगत १४ फेब्रुवारी रोजी हा विभाग चालवणाऱ्या कंपनीला काम थांबवण्याचे आदेश कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने दिले. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने काम थांबवल्याने शहरातील गंभीर करोना रुग्णांना खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय नव्हता. अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना ठाण्याच्या जिल्हा शासकीय किंवा मुंबईच्या रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे इतर वेळी वारेमाप खर्च करणाऱ्या पालिकेला नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे नाही का, अशी टीका सर्वसामान्यांमधून होऊ  लागली होती. ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये २६ फेब्रुवारी रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर दोनच दिवसांत कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने गौरी सभागृहातील अतिदक्षता विभागाचे संचलन करण्यासाठी नोंदणीकृत कंत्राटदारांकडून दरपत्रके मागवण्यासाठी निविदा जाहीर केल्या आहेत.

१२ मार्च रोजी या निविदा उघडण्यात येतील, अशी माहिती कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी दिली आहे. कोणत्याही क्षणी गौरी सभागृहातील कोविड आरोग्य केंद्राची सुविधा असलेले अतिदक्षता विभाग सुरू करण्याची पालिकेची क्षमता आहे. यंत्रणाही सज्ज असून रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे पुजारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील गंभीर करोना रुग्णांना शहरातच मोफत उपचार मिळणे शक्य होणार आहे.

देयकाची तपासणी करूनच देय

यापूर्वीच्या कंत्राटदार कंपनीला सुमारे ६१ लाख ४२ हजारांचे देयक देण्यात आले आहे. मात्र उपचार, औषधे, तपासणी, सामग्रीचे भाडे असे उर्वरित सुमारे सव्वा कोटीचे देयक पालिकेने अद्याप दिले नसल्याचे कळते आहे. या बिलांची तपासणी सुरू असून त्यानंतर ते अदा केले जातील, असे मुख्याधिकारी पुजारी यांनी स्पष्ट केले.