शेतीच्या कामांपुढे अडचणींचा डोंगर; करोनाच्या भीतीमुळे अनेक मजुरांचा कामास नकार

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : पावसाळा तोंडावर असल्याने ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी परिसरांतील ग्रामीण व आदिवासी भागांत शेतकऱ्यांनी भात, नाचणी, वरई या पिकांच्या पेरणी आणि उखळणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र पुरेशा प्रमाणात मजूर मिळत नसल्याने अनेक गावांमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर काम करण्यास अनेक मजूर नकार देत असल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांना आदिवासी आणि दुर्गम भागांतील मजुरांवर अवलंबून राहावे लागते. गावागावांमधील शेतकरी टॅक्टर, टेम्पो घेऊन आदिवासी मजुरांना आणण्यासाठी जातात, मात्र त्यांना आदिवासी पाडय़ांच्या प्रवेशद्वारावर अडविले जाते. गावाच्या बाहेर थांबवून तिथे शेतकऱ्यांशी मजुरांविषयी चर्चा केली जाते. ‘तुमच्या गावात करोना रुग्ण आहेत का, रुग्ण असतील तर वाडीतील एकही मजूर कामासाठी येणार नाही’, अशी उत्तरे आदिवासी पाडय़ाच्या प्रमुखांकडून शेतकऱ्यांना दिली जात आहेत.

लागवड क्षेत्र

* भात : ५९ हजार २७९ हेक्टर

* नाचणी : ३ हजार ३७८ हेक्टर

* वरई : ९१६.१२ हेक्टर

* भाजीपाला, कडधान्य : ६७ हजार ४४३ हेक्टर

मजूरही १४ दिवसांच्या विलगीकरणात

ज्या मजुरांना शेती कामासाठी बाहेर पडायचे आहे, त्यांनी किमान १४ दिवस पाडय़ांवर फिरकू नये, असा फतवाच काही प्रमुखांनी काढला आहे. या मजुरांची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी, असेही बजाविण्यात येत आहे. थेट १४ दिवसांनंतर पाडय़ावर प्रवेश मिळणार असल्याने कोणीही मजूर मजुरीसाठी जाण्यास तयार होत नाही. गावात गेल्यानंतर करोनाची बाधा झाली तर काय करायचे, अशी भीती मजुरांमध्ये असल्याने ते नकार देत आहेत, असे हरिश्चंद्र वरकुटे या शेतकऱ्याने सांगितले. ‘मागील तीन महिने करोनाच्या भीतीने आम्ही कुटुंबासह घराबाहेर पडलो नाही. मजुरीसाठी गेलो तर तेथून आजार पुन्हा आदिवासी पाडय़ात पसरण्याची भीती आहे,’ अशी प्रतिक्रिया वाडीवरील हेंद्रय़ा हिलम या मजुराने दिली.