News Flash

‘आणखी पु. ल.’ विशेषांकाचे आज ठाण्यात प्रकाशन

अप्रकाशित साहित्यासह पुलं आणि सुनीताबाईंच्या सहजीवनाचा धांडोळा

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित बाबींसह अप्रकाशित साहित्य, भाषणे आणि पत्रांचा बहुमोल ठेवा असलेल्या ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाचे ‘लोकसत्ता’तर्फे आज ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे प्रकाशन होत असून हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

‘‘भाईकाकांना माणसांत मिसळायची, कलांचा आणि निर्मितीचा आनंद घेण्याची आणि देण्याचीही जबरदस्त तहान होती. याउलट माईआते एकटीच वाचन करत, कविता मनात घोळवीत, कामांत स्वत:ला गुंतवून घेऊन अनेक दिवस राहू शके. भाईकाकांनी १९५३ च्या सुमारास तिला याबद्दल विनोबांच्या एका सुंदर प्रवचनाचा उल्लेख करून म्हटले आहे, ‘जे जे होईल ते ते पाहावे, तुका म्हणे स्वस्थ राहावे’मधल्या ‘पाहण्यात’ निर्भयता आहे. त्यातल्या ‘स्वस्थ’ला स्वत:मध्ये स्थिर अशा अर्थाची ‘शेड’ आहे. आपल्यात असलेला तो ‘स्वस्थ’. ती साधना तुला सहज शक्य म्हणून तू योगाचा अभ्यास न करता योगिनी होऊ शकतेस. आम्ही अस्वस्थ आहोत म्हणून भुकेलेले आणि भोगी राहतो. या वेळी भाईकाका फक्त ३४ वर्षांचे होते आणि माईआते २८ वर्षांची!’’ ‘गणगोत’ या पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील ‘दिनू’ हे व्यक्तिमत्त्व त्याही काळात खूपच गाजले. त्या दिनूने म्हणजे डॉ. दिनेश ठाकूर यांनी खूप वर्षांनी त्यांच्या ‘भाईकाका’ आणि ‘माईआते’ (सुनीताबाई) यांच्या सहजीवनाचा आणि त्यांच्यातील नात्याचा मनोज्ञ धांडोळा ‘आणखी पु. ल.’ या आज प्रकाशित होणाऱ्या विशेषांकातील लेखात घेतला आहे.


ऐन आणीबाणीत क ऱ्हाड येथे झालेल्या ५१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदाची सूत्रे श्रीमती दुर्गा भागवत यांच्या हाती देताना पु. ल. देशपांडे यांनी केलेले भाषण हे त्यांच्या वैचारिक विश्वाची ओळख करून देणारे ठरले. ते भाषण त्या वेळी संमेलनात उपस्थित असलेले त्या वेळचे केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मुद्दामहून लिहून घेण्याची व्यवस्था केली होती. हे टाइपरायटरवर लिहिलेले पुलंचे भाषण यशवंतरावांच्या व्यक्तिगत संग्रहात होते. ते भाषण ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाद्वारे वाचकांसमोर येत आहे.

केव्हा – आज

कुठे –
हॉटेल टिपटॉप प्लाझा,
एलबीएस रोड, ठाणे (पश्चिम)

किती वाजता – सायं. साडेसहा वाजता

मुख्य प्रायोजक – परांजपे स्कीम्स

सहप्रायोजक – चितळे बंधू मिठाईवाले, स्टोरीटेल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

आणखी आकर्षण.. : या प्रकाशनानिमित्त ‘शब्दवेध’ या संस्थेतर्फे ‘अपरिचित पु. ल.’ या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर या कार्यक्रमात वाचन आणि संगीत याद्वारे पुलंचे अपरिचित साहित्य सादर करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 11:49 am

Web Title: spacial program loksatta ankhi pu la in thane today 6 pm jud 87
Next Stories
1 ‘आणखी पु. ल.’ विशेषांकाचे आज ठाण्यात प्रकाशन
2 कल्याणमध्ये १९ शैक्षणिक भूखंड
3 वाहन खरेदीकडे ठाणेकरांची पाठ
Just Now!
X