कर्जतजवळच्या रेल्वे पादचारी पुलावर एकही गर्डर चढला नाही;
रेल्वेच्या समन्वयाअभावी प्रवाशांचा चार तासांचा खोळंबा
कर्जत रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर चढवण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेला विशेष वाहतुक ब्लॉक रविवारी पुर्णपणे फसला. या कामासाठी मध्य रेल्वेची वाहतुक भिवपुरी-कर्जत स्थानकादरम्यान सुमारे चार तास थांबवण्यात आली होती. मात्र वाहतुक थांबलेली असतानाही या पुलावर गर्डर चढवण्याची पुरेशी यंत्रणा आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे एकही गर्डर पुलावर चढू शकला नाही. त्यामुळे इथे उपस्थित अधिकारी वर्गाला हतबल होऊन प्रवाशांच्या रोषाचा सामना करावा लागत होता. रेल्वे प्रशासनाने हे काम पुर्ण केले नसल्याने आणखी एकदा त्याच कामासाठी विशेष ब्लॉक घेण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर येऊन ठेपली आहे.
मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाच्या मुंबईकडील बाजुला रेल्वे रूळ ओळांडण्यासाठी पादचारी पुलाची निर्मिती होत असून रविवारी या पुलाचे गर्डर चढवण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने दुपारी चार तासांच्या विशेष वाहतुक बंद ची घोषणा केली होती. दुपारी ११.२० ते ३.२० दरम्यान या कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून सीएसटी-कर्जत, खोपोली या दरम्यानच्या एकुण आठ गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याबरोबच पुणे-कर्जत पॅसेंजर गाडीही रद्द करण्यात आली होती. याशिवाय १५ हून अधिक गाडय़ा केवळ सीएसटी ते भिवपुरीपर्यंत धावत होत्या. या चार तासांत सीएसटीकडून जाणारी एकही गाडी भिवपुरीच्या पुढे जाऊ शकली नाही. तर कर्जत खोपोली कडून एकही गाडी सीएसटीकडे पोहचू शकत नव्हती. रविवारी ब्लॉक सुरू झाला मात्र गर्डर चढवण्याचे साहित्य आणि तंत्रज्ञच नसल्यामुळे हे काम सुरूच होऊ शकले नाही. काम आणि गाडय़ा दोन्ही बंद असल्याचे पाहून प्रवासी स्थानक अधिकाऱ्यांना या विषयीचा जाब विचारत होते. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनाही त्याचे उत्तर देता येत नव्हते. याविषयी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता. ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे याचा अर्थ तिथे काम झाले असेल, मात्र ते पुर्ण झाले नसल्यास पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

हार्बर विस्कळीत

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या फलाट क्रमांक दोनवरील रेल्वे रुळाला तडा गेल्याने सोमवारी हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास विस्कळीत झाली. यात फलाट क्रमांक दोनवरील वाहतूक बंद पडल्याने काही वेळ लोकलसेवा फलाट क्रमांक एकवरून चालवण्यात येत होत्या. दुपारी साडेतीन ते सव्वाचार पर्यंत अनेक गाडय़ांना याचा फटका बसला.

गाडय़ा बंद करूनही काम न झाल्याचा प्रवाशांना फटका बसला असला तरी त्याच बरोबर रेल्वेच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असतो. हे रेल्वेचे नुकसान असून त्याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. याकाळामध्ये प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेचा शोध घ्यावा लागत होता. मात्र भिवपुरी-कर्जत दरम्यान सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत होता. हा रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा असून त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे.
– मनोहर शेलार, अध्यक्ष उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ