गणेशोत्सवासाठी विशेष गाडय़ांची घोषणा अद्याप नाहीच

वसई : दरवर्षी मुंबईसह वसई-विरार व इतर ठिकाणांहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष गाडय़ांची सुविधा केली जाते. परंतु यंदा करोनाच्या संकटामुळे अद्यापही एसटी महामंडळाने विशेष गाडय़ांची घोषणा केली नसल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची चिंता वाढली आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. त्यामुळे या सणासाठी मोठय़ा संख्येने चाकरमानी आपल्या गावी जातात. त्यांना जाण्यासाठी रेल्वे व एसटी यांच्या मार्फत विशेष गाडय़ांची सुविधाही केली जाते, मात्र यंदाच्या वर्षी करोनाच्या महामारीमुळे कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांची घोषणा अद्यापही सरकारकडून करण्यात आली नसल्याने गावी कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. विविध ठिकाणचे नागरिक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा एकाच रस्त्यावर पडणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बस आरक्षित करतात. दरवर्षी १२० दिवस आधीच विशेष गाडय़ांचे आरक्षण केले जाते. परंतु आता गणेशोत्सवासाठी केवळ दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मात्र सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही तसेच, काहीच माहितीही दिली जात नसल्याने चाकरमानी चिंतेत आहेत.

गणेशोत्सव हा कोकणातील पारंपरिक उत्सव आहे. आम्ही जरी मुंबईत राहात असलो तरी दरवर्षी आम्ही सर्व नागरिक या उत्सवाला गावी जातो. यंदाच्या वर्षी करोनाचे संकट आहे याचीही आम्हाला जाणीव आहे. त्या ठिकाणी आम्ही मौजमजेसाठी न जाता जी काही पूर्वीपासूनची परंपरा आहे. याचे जतन व्हावे यासाठी आम्हाला आमच्या गावी जावेच लागणार असल्याचे चाकरमान्यांनी सांगितले आहे. यासाठी सरकारकडून चाकरमान्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.

एसटीने माफक दरात सुविधा द्या

टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे एसटीने  कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना माफक दर आकारून सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सद्य:स्थितीत राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध ठिकाणच्या भागात प्रवासासाठी सेवा पुरविली जाते. त्यामध्ये केवळ २२ प्रवासी घेऊन प्रवास केला जातो याचे भाडेही दुप्पट आकारले जात आहे त्याचा दरही जास्त आहे. टाळेबंदीआधी प्रवास भाडे हे साधारण ७०० ते ८०० रुपये होते. परंतु आता वेगळे दर आकारले जात असल्याने साधारण भाडय़ाच्या दुपटीपेक्षा अधिक रक्कम वाढली आहे आणि हे सर्वसामान्य प्रवाशाला परवडणारे नाही. यासाठी भाडे आकारतानाही योग्य विचार करून आकारणी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटीने कोणत्याच विशेष गाडय़ांची घोषणा केली नाही. आता थोडे दिवसच बाकी आहेत. यात आरक्षण कसे करणार हा प्रश्न आहे. यासाठी  सरकारने लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा.

– अशोक अंबोरकर, प्रवासी नागरिक कोकण

गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष गाडय़ा सोडण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही.  ज्यावेळी वरिष्ठांकडून  याबाबत धोरणात्मक आदेश येईल त्यानुसार जिल्ह्यतील प्रवाशांसाठी ही सेवा दिली जाईल.

– अजित गायकवाड , विभाग नियंत्रक, पालघर