ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी आता विशेष चौकशी पथक (एसआयटी) तयार केले आहे. या पथकामार्फत आता परमार आत्महत्या प्रकरणाचा तपास सविस्तरपणे करण्यात येणार असून त्यामध्ये आतापर्यंत सापडलेल्या पुराव्यांव्यतिरिक्त आणखी पुरावे सापडतात का, याचा शोध घेण्यात येणार आहे. याशिवाय, याप्रकरणी अटकेत असलेल्या चारही नगरसेवकांच्या मालमत्तेची तपासणी करण्यात येणार आहे.
ठाण्यातील नगरसेवक हनमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण या चौघांना परमार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या चौघांविरोधात पोलिसांनी न्यायालयामध्ये सुमारे ३०४९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. असे असले तरी, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आरोपपत्रांच्या पानांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे असतानाच ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन विशेष चौकशी पथक (एसआयटी) तयार केले आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह पथकात दोन पोलीस उपायुक्त, दोन साहाय्यक पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस निरीक्षक यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी व साहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांचाही पथकात समावेश आहे. या पथकामार्फत विविध अंगांनी तपास करण्यात येणार असून, त्यामध्ये आतापर्यंत सापडलेल्या पुराव्यांव्यतिरिक्त आणखी काही पुरावे हाती लागतात का, याचा शोध घेण्यात येणार आहे. याशिवाय चारही नगरसेवकांच्या मालमत्तेची तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये त्यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.