गेल्या दोन महिन्यांपासून टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता. दुकानांतील कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर होते, परंतु दुकाने खुली होताच ग्राहकांकडून साहित्य खरेदीसाठी प्रतिसाद मिळू लागल्याने व्यापारी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

करोनाची दुसरी लाट वेगाने पसरू लागल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून बंद करण्यात आलेल्या बाजारपेठांमध्ये सोमवारपासून पुन्हा गजबज सुरू झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल केली आणि त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या बाजारपेठा आणि दुकाने सुरू झाली आहेत. ठाणे शहरात दुसऱ्या स्तराचे नियम लागू असल्याने शहरात दिवसभर दुकाने खुली ठेवण्यास मुभा मिळाली आहे. वेळेचे बंधन नसल्यामुळे नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शिवाय दुकाने सुरू होताच ग्राहकांची वर्दळ दिसू लागल्यामुळे दुकानदार, व्यापारी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढणे आणि कमी होणे, ही प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यामुळे टाळेबंदी आणि शिथिलीकरणानंतरचे निर्बंध यातून व्यापारी वर्ग तसेच नागरिक जात आहेत. काही महिन्यांपूर्वी दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास मुभा मिळाली होती. त्यामुळे दिवाळी तसेच नाताळ, नववर्ष हंगामात बाजारांत चैतन्य पाहायला मिळत होते, परंतु फेब्रुवारी महिनाअखेर करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आणि शहरात पुन्हा निर्बंध लागू झाले. त्यातच राज्य शासनाने एप्रिल महिन्यात टाळेबंदी लागू केली. औषधे, जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची दुकाने वगळता अन्य सर्व बाजारपेठा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिणामी, पहिल्या टाळेबंदीच्या तडाख्यातून नुकताच कुठे सावरू लागलेला व्यापारीवर्ग पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला. करोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे व्यापारीवर्गानेही भान राखून टाळेबंदीचे पालन करणे, कामगारांचे लसीकरण करून घेणे यांवर भर दिला, मात्र मेच्या उत्तरार्धात करोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली होती.

जून महिन्यात टाळेबंदी शिथिल झाली आणि त्यात ठाणे शहरात पूर्ण वेळ बाजारपेठा, दुकाने खुली ठेवण्यास परवानगी मिळाली. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या बाजारपेठा आणि दुकाने खुली झाल्यानंतर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले आहेत. करोना संसर्गामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाइनद्वारे शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वह्य़ा, पुस्तके आणि इतर शालेय साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत झुंबड उडत आहे. टाळेबंदीच्या काळात दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मोबाइल तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बिघाड झाल्यानंतर त्याची दुरुस्ती करणे नागरिकांना शक्य होत नव्हते. त्यामुळे दुकाने सुरू होताच नागरिकांनी अशा वस्तूंच्या दुरुस्तीसाठी तसेच नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बैठय़ा चाळींमध्ये राहणारे नागरिक पावसाळ्यापूर्वी घरावर ताडपत्री टाकण्याचे काम करतात. तर इमारतीच्या गच्चीवर वॉटरप्रूफिंगचे काम करण्यात येते. ही कामेही दुकाने बंद असल्यामुळे रखडली होती. त्यामुळे नागरिकांची आता हॉर्डवेअरच्या दुकानांवर ताडपत्री तसेच वॉटरप्रूफिंगचे साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल असे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी येते. यंदाही असे साहित्य विक्रीसाठी आले असून त्याच्या खरेदीसाठी नागरिक शहरातील जांभळी नाका बाजारात तसेच स्थानक परिसरात नागरिक गर्दी करीत आहेत. सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य, कपडे आणि चप्पल अशी खरेदी महिला वर्गाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अशा दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.