News Flash

खाऊखुशाल : मसाला कटलेट आणि गरमागरम समोसा..!

कोणताही पदार्थ मुखात जाऊन त्याची चव चाखण्याआधी त्याचा गंध नाकात शिरतो

कोणताही पदार्थ मुखात जाऊन त्याची चव चाखण्याआधी त्याचा गंध  नाकात शिरतो. त्यामुळे भूक चाळवते. त्यामुळे घराबाहेर कुठे काही बरे पदार्थ शोधणारे खवय्ये आधी खमंग वासाने परीक्षा करतात. त्या परीक्षेपुढे दुकान छोटे आहे की मोठे हे फारसे महत्त्वाचे नसते. त्यामुळे अगदी छोटी टपरी असली तरी तेथील पदार्थाच्या गुणवत्तेनुसार तिथे खवय्यांची गर्दी दिसते.

फास्टफूडमध्ये आता बरेच वैविध्य पाहायला मिळते. प्रत्येक जण त्यात चवीचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करताना दिसतो. ठाण्यातील सुंदर स्नॅक्स कॉर्नरही अशांपैकी एक आहे. मसाला कटलेट आणि पंजाबी समोशांसाठी येथे खवय्ये मोठय़ा संख्येने येतात. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटणाऱ्या या पदार्थाबद्दल सांगताना पार्वती शर्मा म्हणाल्या, चार भाज्यांचा वापर करून आम्ही हे कटलेट बनवितो. त्यामुळे जी लहान मुले भाज्या खात नाहीत, त्यांना हे कटलेट आवर्जून खायला दिले तर सर्व प्रकारच्या भाज्या त्यांच्या पोटात जातात. त्यामुळे पालकांची ‘मुलं भाजी खात नाहीत’ ही तक्रार दूर होते. विशेष म्हणजे इथे घरगुती मसाले वापरले जातात. तेलाचा वापरही कमी प्रमाणात असतो. त्यामुळे हे कटलेट खाल्ल्यानंतर जिभेचे चोचले पुरविले जातातच, शिवाय पोट भरल्याने मनही तृप्त होते. दिवसभरात या ठिकाणी साधारण ४०० ते ५००  कटलेटच्या प्लेट अगदी सहज संपतात. इतर सगळ्या गोष्टी महाग झाल्या, मात्र सुंदर स्नॅक्स कॉर्नरमधील मसाला कटलेट प्लेट फक्त २० रुपयांनी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. पैशांपेक्षा खवय्यांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान अधिक महत्त्वाचे वाटते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पाच किलो मसाला महिनाभरात संपत असल्याचेही त्यांनी सांगितले. या कटलेटचा रंग आणि आकारही सारखाच असल्याने चवीबरोबरच त्याचे दर्शनही नेत्रसुखद असते. त्यामुळे न्याहरी किंवा नाश्त्यासाठी आलेले खवय्ये अनेकदा जेवणाची कसर भरून काढत भरपेट कटलेटवर ताव मारतात. येथे पंजाबी समोसे खाण्यासाठीही खवय्ये गर्दी करतात. पंजाबी समोशांमध्येही बटाटा, मटार आणि घरगुती मसाल्याचा वापर असतो. येथील समोसा छान सारणाने गच्च भरलेला असतो. त्यामुळे खाताना खुसखुशीत पापडी आणि चविष्ट भाजीची चव जिभेवर रेंगाळत राहते आणि समोसे खाण्यासाठी पुन्हा पावले याच स्नॅक्स कॉर्नरकडे वळतात. या स्नॅक्स कॉर्नरला साधारण १०-१५ वर्षे झाल्याचे शर्मा यांनी सांगितले. खवय्यांना गरमच समोसे मिळावे, असा पार्वती शहा यांचा प्रयत्न असतो. गरम आणि चवदार समोशाच्याही दिवसाला दोन-तीनशे प्लेट हमखास संपतात. हल्ली स्नॅक्स कॉर्नर म्हटले की दाक्षिणात्य पदार्थ अत्यावश्यक ठरतात. सुंदर स्नॅक्स कॉर्नरही त्याला अपवाद नाही. मेदुवडा, डोसे, इडली हे पदार्थ येथे मिळतात. त्यासाठी लागणारा रवा आणि तांदळाचा भरडा काढण्यापासून इतर सर्व प्रक्रिया घरच्या घरी केली जाते. व्हेज-नॉनव्हेज बिर्याणीही येथे उपलब्ध आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी दोन्ही प्रकारची बिर्याणी मिळते. काही खवय्ये तर ऑर्डर देऊन ही बिर्याणी बनवून घेऊन जातात. एक किलो मांसाहारी बिर्याणीचे ८०० रुपये, तर शाकाहारी बिर्याणी ६०० रुपयांना मिळते.  हे दुकान सकाळी ९.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू असते. त्यामुळे कामावरून घरी जाताना उशीर झाला तर अनेक खवय्ये कटलेट पार्सल घेऊन जातात आणि भाजीऐवजी कटलेटच खातात.

कधी– सकाळी ९.३० ते रात्री ९.३०

कुठे- बी/१, स्वानंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कलावती देवी, परमार्थ निकेतनजवळ, गोखले रोड, ठाणे (प.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 4:07 am

Web Title: spices cutlets and hot samosa
Next Stories
1 गरब्याच्या उत्साहाला तरुणांना ‘टॅटू’चे गोंदण
2 पालिकेच्या बसमध्ये आता मोफत वायफाय
3 महिलावर्गावर सुविधांची बरसात
Just Now!
X