News Flash

यंत्रमाग कारखान्यांना पुन्हा टाळे

भिवंडीत सुमारे पाच लाख यंत्रमाग असून या कारखान्यांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या चार लाख कामगार रोजंदारीवर काम करतात.

|| किशोर कोकणे

सुमारे अडीच लाख कामगार गावी रवाना

ठाणे : राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागील वर्षीच्या टाळेबंदीसारखी परिस्थिती निर्माण होईल या भीतीने भिवंडीतील यंत्रमागावर रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या ६० टक्के कामगारांनी गावचा रस्ता धरला आहे. दुसरीकडे दक्षिण भारतातून येणारा कच्चा मालही उपलब्ध होत नाही. यामुळे गेल्या दीड महिन्यांत भिवंडीतील २० टक्के यंत्रमाग कारखाने बंद पडले आहेत. येत्या काळात अशीच परिस्थिती राहिल्यास उर्वरित कारखानेही बंद पडतील, अशी भीती कारखानदारांकडून व्यक्त होत आहे.

भिवंडीत सुमारे पाच लाख यंत्रमाग असून या कारखान्यांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या चार लाख कामगार रोजंदारीवर काम करतात. सुमारे ३०० ते ८०० रुपये दररोज या कामगारांना मिळत असतात. यामध्ये ९० टक्के कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा राज्यांतील आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही दिवसांपासून निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांतून कारखानदारांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे भिवंडीतील यंत्रमाग सुरूच आहेत. असे असले तरी मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्व वाहतूक बंद केली जाईल या धास्तीने गेल्या दीड महिन्यांत ६० टक्के म्हणजेच सुमारे अडीच लाख कामगार हे त्यांच्या गावी परतले आहेत. या कामगारांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही सोय करायला आम्ही तयार होतो. मात्र कामगारांना मागील वर्षी पायपीट करत तसेच सायकलींचा आधार घेत हजारो किलोमीटर अंतर पार करत गाव गाठावे लागले होते. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून हे कामगार गावी निघून गेले, असे कारखानदारांनी सांगितले. याचा फटका मात्र यंत्रमाग कारखानदारांना बसू लागला आहे. आता केवळ ४० टक्के कामगार भिवंडीत शिल्लक आहेत. या कामगारांच्या आधारे भिवंडीतील यंत्रमाग कारखाने चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामगार कमी असल्याने उत्पादनातही घट झाली आहे. जे उत्पादन मिळते ते विकलेही जात नाही, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे दक्षिण भारतातून येणारा कच्चा माल उपलब्ध होत नाही. त्यामुळे येत्या काळात सुरू असलेले यंत्रमागही बंद होण्याची शक्यता आहे. यंत्रमाग बंद ठेवल्यास बँकांचे कर्ज कसे फेडणार, कामगारांना पैसे कुठून देणार, असा प्रश्न यंत्रमाग मालकांना पडला आहे.

भिवंडीतील यंत्रमाग किती महत्त्वाचा?

भिवंडी शहर हे देशातील कापडनिर्मितीचे महत्त्वाचे शहर आहे. दररोज या यंत्रमागांतून कोट्यवधी रुपयांचे कापड तयार होत असते. यातील ६० ते ७० टक्के कापड हे देशातील विविध राज्यांमध्ये पाठविले जाते. तर  ३० ते ४० टक्के कापड हे व्हिएतनाम, बांगलादेशमध्ये पाठविले जाते.

यंत्रणेसाठी १५ ते २० हजार

यंत्रमाग कारखाना १५ दिवस बंद ठेवला तरीही यंत्रणा धुळीमुळे खराब होत असतात. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. त्या ठिकाणी पुन्हा कामगारांना बोलावणे, त्यांचा शोध घेणे ही कामेही करावी लागतात. त्यामुळे कारखाने बंद झाल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यासाठीही अनंत अडचणी असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर आम्ही शासकीय नियमांचे पालन करून कारखाने चालवित आहोत. अनेक कारखानदारांनी यंत्रमाग चालविण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. करोनाचा प्रादुर्भाव अशाच प्रकारे कायम राहिला तर, बँकेचे कर्ज कसे फेडणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कारखानदारांचा विचार करून कर्जावरील व्याज माफ करावे, करोनाचे चित्र असेच राहिले तर, कारखानदारांना पुढील काळात यंत्रमाग बंद करावे लागतील. – पुरुषोत्तम वंगा, अध्यक्ष, भिवंडी पद्मानगर पॉवरलूम विव्हर असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 12:12 am

Web Title: spinning mills corona virus akp 94
Next Stories
1 रुग्णवाहिकांसाठी अवाजवी दर नकोत
2 प्लाझ्मा दान मोहीम गंभीर रुग्णांसाठी जीवनदायी
3 उद्या ठाण्यात लसीकरण बंद! महापौरांनी केलं जाहीर!
Just Now!
X