कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे भव्य शिलास्मारक उभारणाऱ्या एकनाथ रानडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता येत्या मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी डोंबिवलीतील टिळकनगर शाळेच्या पटांगणात होणार आहे. विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे प्रमुख वक्त्या म्हणून या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. विवेकानंदांना अपेक्षित असलेल्या अध्यात्मप्रेरित समाजसेवेच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी १९७२ मध्ये एकनाथ रानडे यांनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली. देशभरातील २२ राज्यात सध्या एकूण ८३८ विवेकानंद केंद्र कार्यरत आहेत. ठाणे परिसरातही विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्याची ही थोडक्यात ओळख..

विवेकानंद केंद्र, ठाणे परिसर
‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हा संदेश देऊन स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्म प्रेरणेतून लाखो भाविकांना समाजसेवा करण्यास प्रवृत्त केले. परमेश्वर ही कोणतीही बाह्य़शक्ती नसून ती प्रत्येकाच्या अंतर्मनात आहे, सेवा आणि त्याग या वृत्तीमुळेच खरे सुख मिळते, हे विवेकानंदांच्या विचारांचे सार आहे. भारतातील नव्या पिढीच्या मनावर हे विचार बिंबविण्यासाठी एकनाथ रानडे यांनी ठिकठिकाणी विवेकानंद केंद्रांची स्थापना केली. ठाणे जिल्ह्य़ातही ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथे विवेकानंद केंद्राच्या शाखा कार्यान्वित आहेत. लवकरच कल्याण येथेही केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून सातत्याने आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विवेकानंदांना अभिप्रेत असलेले समाजोद्धाराचे, राष्ट्र उभारणीचे कार्य घडतेच. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशा उपक्रमातील सहभागामुळे व्यक्तीच्या मनावरील ताणांचे आपोआप व्यवस्थापन होते.
नवी मुंबई, डोंबिवली तसेच जिल्ह्य़ातील इतर केंद्रांमध्ये अनेक सेवानिवृत्त निरलस पद्धतीने केंद्राच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात आपापला खारीचा वाटा उचलीत आहेत. त्याचप्रमाणे अनेक तरुणही कार्यकर्ते म्हणून केंद्राच्या कार्यात सहभागी होऊ लागले आहेत. आठवडय़ातून किमान दीड तास समाज सेवेसाठी देणे शक्य असणारी कोणतीही व्यक्ती विवेकानंद केंद्राची सभासद होऊ शकते. योग, अध्यात्म अथवा संस्कार वर्गाद्वारे समाजातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत विवेकी विचार पोहोचविण्याचे कार्य केंद्राच्या माध्यमातून केले जाते. नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्रातील मुख्य विवेकानंद केंद्र आहे. तिथे त्या त्या विषयांचे रीतसर प्रशिक्षण दिले जाते. विवेकानंद जयंती (१२ जानेवारी, युवा दिन), गुरुपौर्णिमा, विश्वबंधुत्व दिन (११ सप्टेंबर, विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत याच दिवशी जगप्रसिद्ध भाषण केले.), साधना दिन (१९ नोव्हेंबर, एकनाथ रानडे यांचा जन्मदिन) आणि डिसेंबर महिन्यात येणारी गीताजयंती केंद्रातर्फे साजरी केली जाते. यानिमित्ताने निरनिराळे उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केंद्राचे कार्यकर्ते करतात. सध्या महाविद्यालयीन युवकांपर्यंत विवेकानंदांचे विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केंद्राचे साधक करीत आहेत.

आरोग्य सेवेचा योग

योग प्रशिक्षण हा विवेकानंद केंद्राचा एक मुख्य उपक्रम आहे. केंद्रांच्या शाखांमधून सकाळ-संध्याकाळी नियमितपणे योगवर्ग भरतात. आता आधुनिक आरोग्य सुविधेनेही योगाचे महत्त्व मान्य केले आहे. ‘प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर’ हा सुदृढ आरोग्याचा हेतू साध्य होण्यात नियमित योगसाधना उपयोगी ठरते. रक्तदाब, मधुमेह हे धावपळीच्या जीवनशैलीतून जडणारे आजार आटोक्यात आणण्यात योगसाधना उपयोगी ठरते. त्यामुळे केंद्रातील योगवर्गाना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. केंद्राचा हा उपक्रम समाजाचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण ठरत आहे.

नव्या पिढीशी संवाद

केंद्राच्या माध्यमातून नियमितपणे शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कारवर्ग भरविले जातात. पाचव्या इयत्तेपासून या वर्गात मुलांना प्रवेश दिला जातो. शाळेच्या आवारात अथवा अन्य ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागेत संध्याकाळच्या वेळी हे वर्ग भरतात. या वर्गामध्ये सूर्य नमस्कार, विविध प्रकारचे खेळ, गाणी, गोष्टी अशी धमाल असते. हल्ली संगणक संस्कृतीचे प्रस्थ वाढल्यापासून मुले फारशी खेळत नाहीत. या संस्कार वर्गाच्या निमित्ताने त्यांना सवंगडय़ांसोबत मनसोक्त खेळू दिले जाते. त्यातूनच त्यांच्यावर व्यक्तिमत्त्व विकासाचे संस्कार केले जातात. केंद्रांच्या या संस्कार वर्गाचे वैशिष्टय़ म्हणजे इथे कुणीही मोठी व्यक्ती शिकविण्यासाठी नसते. थोडय़ा मोठय़ा इयत्तेमधील मुले संस्कार शिबिरांमध्ये शिकवितात. शाळेत क्रमिक अभ्यासक्रमाद्वारे ही मुले शिकत असतातच. या संस्कार वर्गात एक उत्तम व्यक्ती म्हणून समाजात वावरताना उपयुक्त असणाऱ्या मूल्यांची शिकवण देण्याचा प्रयत्न केला जातो. या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना विवेकानंदांची ओळख होते.
केंद्राच्या वतीने ‘कथा विवेकानंदांच्या’ हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. गेली काही वर्षे सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकावर आधारित स्पर्धा केंद्राच्या वतीने घेतली जाते. विवेकानंदांचे विचार संकलन असणारी इतरही अनेक पुस्तके केंद्राने प्रकाशित केली आहेत. वाढती स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे यामुळे हल्ली मुलांच्या मनावर परीक्षांचे दडपण असते. विद्यार्थ्यांच्या मनावरील हा ताण दूर व्हावा म्हणून केंद्राच्या वतीने हल्ली ‘परीक्षा दे हसते हसते’ हा उपक्रम राबविला जातो. याद्वारे त्यांच्या मनातील परीक्षेविषयीची भीती घालवून आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षण अर्धवट सुटलेल्या (ड्रॉपआऊटस्) विद्यार्थ्यांसाठी टाटा मोटर्सच्या सहकार्याने प्लम्विग आणि मोटर मॅकेनिकचे प्रशिक्षण वर्ग केंद्राने सुरू केले आहेत.

ताणतणाव व्यवस्थापन आणि समुपदेशन
हल्ली कॉर्पोरेट विश्वात ताणतणाव व्यवस्थापन आणि समुपदेशनला कमालीचे महत्त्व आले आहे. विवेकानंद केंद्रानेही या बदलत्या जीवनशैलीची दखल घेऊन कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांसाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. स्वानंद या नावाने आयोजित या प्रशिक्षण वर्गानाही उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांसाठीही केंद्राच्या वतीने विशेष प्रशिक्षण दिले जाते. कौटुंबिक स्तरावरील वाढत्या कुरबुरी आणि कलहाचे वास्तव लक्षात घेऊन पती-पत्नींसाठी खास सहयोग वर्ग केंद्राने सुरू केले आहेत. छोटय़ा-मोठय़ा कारणांनी घटस्फोटापर्यंत आलेले दाम्पत्य या सहयोग वर्गाने पुन्हा झाले गेले विसरून एकत्र नांदू लागले आहेत. अशा प्रकारच्या मानसिक उपचारांना, अथवा कार्यशाळांना इतरत्र महागडे शुल्क आकारले जाते. विवेकानंद केंद्राच्या वतीने त्यांना या साऱ्या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. विवेकानंद केंद्राचे पूर्वाचल भागातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आदी राज्यांमध्येही मोठे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सुरू आहे. तिथेही कार्यकर्ते सेवेसाठी जातात.

’संपर्क ’
विवेकानंद केंद्र, लक्ष्मी विनायक सोसायटी, तळमजला, कल्याण रोड, मंजुनाथ शाळेजवळ, डोंबिवली (पूर्व) संपर्क- ९८२०८३१५७१, ९८६९०७३३८०.